फरहान अख्तरचा ‘तूफान’ हा सिनेमा येत्या 21 मे ला अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होतोय. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी उत्सुकता ताणली गेली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र करोनाचं संकट आणि लॉकडाउन यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. होती.
नुकताच ‘तूफान’ चा पहिला टीझर रिलीज झालाय. या टीझरला प्रेक्षकांचा चांगसाचं प्रतिसाद मिळताना दिसतोय. या टीझर मधून सिनेमात दमदार अॅक्शन पाहायला मिळणार याचा अंदाज येतोय. या सिनेमात फरहानसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर झळकणार आहे. तर परेश रावल यांनी फरहानच्या कोचची भूमिका साकारली आहे. अॅक्शन सीन सोबतच या टीझरमध्ये काही दमदार डायलॉग पाहायला मिळत आहेत.
View this post on Instagram
‘तूफान’ च्या टीझरची सुरुवातच एका बॉक्सिंग रिंगमधून होते. बॉक्सिंग रिंगमध्ये मध्ये एका बॉक्सरसमोर फरहानचा पराजय झाल्याचं दिसतंय. हा पराजय न पचल्यानं तो गुंडगिरी वळतो. मात्र मृणाल त्याला पुन्हा एकदा बॉक्सिंगकडे वळण्यासाठी प्रवृत्त करते. त्यानंतर परेश रावल यांच्या मदतीने तो कश्या प्रकारे विजय मिळवत जातो याचा थरार पाहायला मिळतोय.
फरहानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरदेखील सिनेमाचा टीझर शेअर केलाय. या टीझरला चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. ज्यात फरहान बॉक्सिंग रिंगमध्ये असल्याचं दिसतं होतं. या सिनेमासाठी फरहानने मोठी मेहनत घेतलीय. एका बॉक्सरची भूमिका साकारण्यासाठी त्याने अॅब्स बनवण्यासाठी वर्कआउटवर भर दिला होता.
करोनाचं उद्भवलेलं संकट आणि लॉकडाउन यामुळे अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. ‘तूफान’ सोबतच कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ हा देखील ओटीटीवर लवकरच प्रदर्शित होणार आहे.