मराठी नाटकांचा अर्थसंकल्प फारच अल्प असतो, खासकरून प्रायोगिक नाटकांचा. त्यामुळे काही गोष्टी करायच्या राहून जातात. हात आखडता घ्यावा लागतो. पण हेच नाटक जेव्हा हिंदी भाषेमध्ये होतं, तेव्हा त्याच्यामागे एखादी संस्था किंवा समूह उभा राहतो. अर्थसंकल्प जसा वाढतो तशी नाटकाच्या प्रयोगशीलतेची व्याप्तीही वाढते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या पृथ्वी थिएटरमध्ये सुरू असलेलं मोहित टाकळकर लिखित आणि दिग्दर्शित पुण्याच्या आसक्त कलामंचाचे ‘गजब कहानी’ हे नाटक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे नाटक काही वर्षांपूर्वी ‘गजब कहाणी’ म्हणून मराठीत केलं गेलं. महाराष्ट्रातल्या गावांमध्येही त्याचे प्रयोग झाले. पण निधीअभावी बऱ्याच गोष्टी त्या वेळी करायच्या राहून गेल्या. पण जेव्हा बिर्ला समूहाची ‘आद्यम’ ही संस्था या नाटकाच्या पाठिशी उभी राहिली तेव्हा हिंदीमध्ये हे नाटक करताना त्याला वेगळं वलय निर्माण झालं. ही गोष्ट आहे एका हत्ती आणि माहूताच्या प्रवासाची, हत्तीला ‘गज’ म्हणतो त्यावरून या नाटकाचं नाव ठेवण्यात आलं. १६०० साली पोर्तुगालमध्ये लिस्बन येथे राहणाऱ्या एका राजाला भारतातून एक हत्ती भेट म्हणून देण्यात आला. तो समुद्रामध्ये गोव्याहून लिस्बनला पाठवण्यात आला. काही काळ त्या राजाला हत्तीचं अप्रूप वाटलं, पण काही वर्षांनी त्याला त्या हत्तीचा कंटाळा आला. त्याच वेळी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे त्याच्या पुतण्याला मोठा हुद्दा देण्यात आला. त्या वेळी राजाने शक्कल लढवून हा हत्ती त्याच्याकडे पाठवायचं ठरवलं. लिस्बन ते व्हिएन्ना हा जवळपास तीन हजार किलोमीटरचा प्रवास राजाच्या मूर्खपणामुळे हत्ती आणि त्याच्या माहूताला चालत करावा लागला. या प्रवासात हत्ती आणि त्याचा माहूत यांच्यातील नातं दाखवण्यात आलं आहे. युरोपमध्ये त्या वेळी हत्ती बऱ्याच जणांनी प्रत्यक्ष पाहिलाही नव्हता. त्या लोकांना हत्तीला पाहून काय वाटलं, त्यांनी त्याला कशी वागणूक दिली, या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. आल्प्ससारखा प्रदेश हत्तीसाठी नवीनच. त्या वेळी हत्ती आणि माहूताचं काय झालं, या प्रवासातील अडचणींवर त्यांनी कशी मात केली, हे नाटक दाखवतं. या नाटकाच्या माध्यमातून जगाचं राजकारण, समाजकारण, माणसांचे स्वभाव, त्यांची विचार करण्याची पद्धत, कुवत, त्यांचा दृष्टिकोन, नवीन गोष्ट पाहिल्यावर त्याला दिलेला प्रतिसाद, यांसारख्या बऱ्याच गोष्टी आपल्याला समजत जातात. बौद्धिक दिवाळखोरीवर बोट ठेवणारं हे नाटक आहे.

सध्याच्या नाटकांमध्ये आपण सरासरी पाच-सहा कलाकार पाहतो, पण या नाटकात ३० कलाकार आहेत. हे सारे कलाकार भारताच्या विविध राज्यांतून आलेले आहेत. नाटकापूर्वी ते एकमेकांना ओळखतही नव्हते. त्यासाठी कामशेत येथे दोन महिन्यांची तालीम ठेवण्यात आली होती. या तालिमीदरम्यान कलाकारांनी एकमेकांना जाणून घेतलं, त्याचबरोबर हत्तीवरचे बरेच सिनेमेही पाहिले. या नाटकातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रयोग म्हणजे, हे नाटक माणसांच्या सभोवताली सुरू असतं. साधारण आपल्या नाटय़गृहांमध्ये नाटक रंगमंचावर होतं आणि प्रेक्षक ते समोरून पाहत असतात. पण हे नाटक मोठय़ा सभागृहात होतं. सभागृहाच्या मध्यभागी प्रेक्षकांची आसन व्यवस्था असते आणि त्यांच्या सर्व बाजूंनी हे नाटक घटतं. आपण या नाटकातलेच एक आहोत हे प्रेक्षकांना जाणवण्यासाठी हा खास प्रयोग केला गेला आहे. या नाटकातील हत्तीची भूमिका गीतांजली कुलकर्णी करते, तर एका राणीची भूमिका पुरुष कलाकार करतो. हत्ती म्हटल्यावर तो दाखवायचा कसा, फक्त दाखवून चालणार नाही तर त्याचा प्रवास, त्याच्यावर बसलेला माहूत हे प्रेक्षकांसमोर कल्पकतेनं मांडलं गेलं आहे.

प्रत्येक नाटकाची वेगळी गरज असते. त्यानुसार या नाटकाची तीस कलाकारांची गरज आहे. नाटक मराठीमध्ये करताना काही गोष्टी मला करता आल्या नाहीत. त्या वेळी या नाटकाकडे पाहण्याची माझी समजही प्रगल्भ नव्हती. पण कालांतराने मला हे नाटक वेगळं वाटत गेलं. मी कधीही एकदा केलेलं नाटक पुन्हा करत नाही, पण या नाटकाला आपण पुन्हा एकदा प्रतिसाद द्यावा, असं वाटलं. चांगली संस्था पाठीशी उभी राहिली. त्यामुळे मनाप्रमाणे ते बसवता आलं. हे नाटक बसवणं, हे दिग्दर्शकासाठी फार आव्हानात्मक आहे. हे नाटक भारतापासून जगातल्या सर्वच राजकारणावर भाष्य करतं. माणसांची मनोवृत्ती दाखवून देतं आणि प्रत्येकाला आपलंसं करणारं हे नाटक आहे. पृथ्वी थिएटरमध्ये काम करणं, हे नेहमीच आनंद देणारं असतं. कारण भारतातील सर्वोत्तम थिएटरमध्ये काम करायला मिळणं, हे नेहमीच आवडतं, असं मोहित सांगून जातो. विजयाबाई मेहतांनीही या नाटकाची स्तुती केली आहे. एखादी गोष्ट आपल्याला दिसते, पण तिला किती कंगोरे असू शकतात आणि किती विविध गोष्टींवर ते सहज भाष्य करून जातं, हे या नाटकात पाहायला मिळतं. त्यामुळे या अजब प्रवासाच्या गजब कहानीची सैर एकदा तरी करायलाच हवी.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gajab kahani marathi drama produce by aasakta kalamanch pune
First published on: 23-07-2017 at 03:31 IST