संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ सिनेमाला सुप्रीम कोर्टाने आज हिरवा कंदील दिला असला तरी कालपर्यंत काही राज्यांमध्ये या सिनेमावर बंदी घालण्यात आली होती. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे त्या राज्यांमध्ये ‘पद्मावत’ला कडाडून विरोध होताना दिसत आहे. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या चार राज्यांत सिनेमावर बंदी घालण्यात आली होती. पण एकीकडे बंदी असूनही इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या स्वागतासाठी गुजरातमध्ये ‘घुमर’ गाणे वाजवण्यात आले.

बुधवारी नेतान्याहू गुजरात दौऱ्यावर होते. अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी काही सांस्कृतिक कार्यक्रम झाले. या कार्यक्रमादरम्यान भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ सिनेमातील ‘घुमर’ गाण्यावर एका ग्रुपने डान्स केला. या सर्व प्रकारावर मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंगने आक्षेप नोंदवला होत. रतलाम येथील एका शाळेत घुमर गाण्यावर डान्स केल्यामुळे शाळेत तोडफोड करण्यात आली होती. यावर स्पष्टीकरण देताना सिंग यांनी सांगितले की, ‘जर पद्मावत सिनेमावर बंदी घातली आहे, तर मग त्यातील गाणेसुद्धा वाजवले नाही पाहिजे.’

दरम्यान, ‘पद्मावत’ या सिनेमाच्या प्रदर्शनावर असलेल्या बंदीवर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता हा सिनेमा देशातील सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमा प्रदर्शनावर चार राज्यांमध्ये असलेल्या बंदीविरोधात निर्मात्यांनी याचिका दाखल करत सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुरुवारी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही सर्व राज्यांची आहे आणि चित्रपट स्क्रिनिंगदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. सिनेमात नावापासून अनेक बदल करण्यात आलेले असून परीनिरीक्षण मंडळाने सुचवेलेले बदलही केले आहेत. यानंतरही राज्य सरकारांना या सिनेमावर बंदी घालण्याचा अधिकार कसा काय असू शकतो, असा सवाल करण्यात निर्मात्यांनी दाखल केलेल्या याचिकेतून केला होता. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.