करिअरमधल्या पहिल्या चित्रपटापासूनच अभिनेत्री जान्हवी कपूरने ट्रोलिंगचा सामना केला. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची मुलगी असलेल्या जान्हवीला सोशल मीडियावर अजूनही ट्रोल केलं जातं. श्रीदेवी यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर काही दिवसांनी जान्हवीचा ‘धडक’ हा पहिलाच चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी झालेल्या ट्रोलिंगचा कटू अनुभव जान्हवीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला.

“जेव्हा माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा लोकांनी मला असंही सुनावलं की बरं झालं तुझी आई हे सर्व बघायला जिवंत नाही. पण या ट्रोलिंगचा परिणाम मी माझ्यावर होऊ देणार नाही. माझ्यात आणखी सुधारणा करण्यासाठी मी त्यांचा वापर करेन”, असं जान्हवी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

आणखी वाचा : सुशांतच्या आत्महत्येवर नवाजुद्दीनने उपस्थित केला प्रश्न; म्हणाला…

जान्हवीचा नुकताच ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. जान्हवीसोबत यामध्ये अंगद बेदी, पंकज त्रिपाठी आणि विनीत कुमार सिंग यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.