काही दिवसांपूर्वी “हो, आहे मी पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा एजंट आहे” असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेता हमजा अली अब्‍बासी याने अभिनय क्षेत्रातून कायमस्वरुपी निवृत्ती घेतली आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने जगभरात इस्लाम धर्माचा प्रचार करण्यासाठी अभिनयसृष्टीला राम राम ठोकला आहे.

हमजा अली अब्‍बासी हा एक पाकिस्तानी अभिनेता आहे. ‘मैं हूं शाहिद अफ्रीदी’ और ‘प्‍यारे अफजल’ या पुरस्कार विजेत्या चित्रपटांमुळे तो नावारुपास आला. त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. पाकिस्तान सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जात होते. त्यामुळे त्याचा अभिनय सोडण्याचा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे.

हमजा अली अब्‍बासी याने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करुन आपल्या निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तो आपले उर्वरित आयुष्य इस्लामच्या सेवेत व्यतित करणार आहे. आपल्या १० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत आलेले विविध अनुभव त्याने या व्हिडीओत सांगितले आहेत.