scorecardresearch

हॅरीच्या आठवणी!

जवळपास गेल्या महिन्याभरापासून ‘हॅरी पॉटर’ची जाहिरात सर्वत्र पाहायला मिळत आहे.

हॅरीच्या आठवणी!

|| गायत्री हसबनीस

एक आरामदायी खोली, त्या खोलीत सोफ्यावर डाव्या बाजूला हर्मायनी बसली आहे. ती पांढऱ्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या बाजूलाच मध्यभागी रॉन बसलेला आहे आणि त्या दोघांच्या समोरच साक्षात हॅरी पॉटर बसलेला आहे. हे त्रिकूट, अर्थात या तीन घट्ट मित्रांना एकाच क्षणी एकाच ठिकाणी पाहण्याचा योग तब्बल १० वर्षांनी जुळून येतो आहे. हे तिघं मित्र हॅरी पॉटरच्या कुठल्या चित्रपटातून समोर येणार नाही आहेत, तर ‘हॅरी पॉटर’ चित्रपट मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येऊन २० वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्ताने या तीन जिवलग मित्रांच्या पुनर्भेटीचा (रियुनियन) कार्यक्रम आयोजित केला गेला. यात या तिघांनीही प्रेक्षकांशी ‘हॅरी पॉटर’ चित्रपटाविषयीच्या गप्पा, किस्से आणि आठवणींची मैफल रंगवली आहे. रॉन, हर्मायनी आणि हॅरी पॉटर… ‘फ्रेंड्स’च्या रियुनियनप्रमाणे हॅरी पॉटरच्या रियुनियनची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत याबद्दल काहीच शंका नाही.

जवळपास गेल्या महिन्याभरापासून ‘हॅरी पॉटर’ची जाहिरात सर्वत्र पाहायला मिळत आहे. समाजमाध्यमांवर तर हॅरी पॉटर आणि त्याच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पोस्टही फिरायला लागल्या होत्या. हॅरी पॉटरचा नवा चित्रपट पुन्हा येणार की काय? या कल्पनेनेच बरेच जण आनंदून गेले होते; पण हळूहळू गुलदस्त्यात असलेली गंमत समोर आली. खुद्द हर्मायनी म्हणजेच अभिनेत्री एमा वॉटसनने इन्स्टाग्रामवरूनच या रियुनियनविषयी जाहीर केले. २००१ साली ‘हॅरी पॉटर’ची जादू लहान, प्रौढ आणि तरूण प्रेक्षकांपर्यंत पोहोचली होती, आज २० वर्षं उलटली असली तरी या चित्रपट मालिकेची जादू कायम आहे. हॅरी पॉटरचे चित्रपट तेव्हाच्या पिढीने अगदी मनापासून पाहिले. विशेष म्हणजे मागच्या पिढीचे बालपण समृद्ध करणाऱ्या हॅरी पॉटरने नव्या पिढीलाही भुरळ घातली आहे. हेच सत्य जगाला अधिक सुखावणारे आहे. २०११ साली ‘हॅरी पॉटर’चा शेवटचा भाग प्रदर्शित झाला होता. त्या गोष्टीला आता १० वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘हॅरी पॉटर’ चित्रपट मालिका ‘वॉर्नर ब्रदर्स’ची आहे. २००१ साली पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला आज वीस वर्षे पूर्ण झाली असल्याचा हा क्षण साधत हॅरी पॉटरच्या चाहत्यांसाठी नववर्षात म्हणजेच १ जानेवारीला हॅरी पॉटरच्या संपूर्ण कलाकारांसह ‘हॅरी पॉटर रियुनियन’चा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. ‘एचबीओ मॅक्स’ आणि ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर याचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.  ‘हॅरी पॉटर’ चित्रपट मालिकेच्या चाहत्यांनी रियुनियनच्या पोस्ट्स धडाधड समाजमाध्यमांवरून सर्वदूर पसरवायला सुरुवात केली आहे.

डॅनियल रॅडक्लिफ, रूपर्ट ग्रिंट आणि एम्मा वॉटसन यांची २००१ मध्ये झालेली पहिली पत्रकार परिषददेखील समाजमाध्यमावर पुन्हा पोस्ट केली गेली. त्यानंतर तिघांचा सेटवरचा पहिला दिवस आणि शेवटच्या दिवशी काढलेला फोटोदेखील चाहत्यांनी पोस्ट केला होता. परदेशातील, खास करून इंग्लंडमधील वृत्तपत्रे आणि नियतकालिके, ऑनलाइन संकेतस्थळांवरील सर्वच मनोरंजनाच्या बातम्यांमध्ये मुख्य बातमी रियुनियनचीच पाहायला मिळते आहे. त्याचबरोेबर हॅरी पॉटरचे चित्रपट चित्रित करत असताना पडद्यामागे या तिघांनी केलेली गंमतजंमत, ज्याचे काढलेले व्हिडीओही पोस्ट करण्यात आले आहेत आणि अजूनही हा सिलसिला सुरू आहे. एकदंरीत चाहतावर्गामध्ये हॅरी पॉटरच्या रियुनियनच्या बातमीने चांगलाच आनंदाचा माहौल तयार केला आहे. एवढेच नव्हे तर, छोटेमोठे ब्रॅण्ड्सदेखील आपल्या जाहिरातींसाठी या रियुनियनचा आधार घेत आहेत. त्यामुळे हॅरी पॉटरची जादू सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करणारी आहे यात काहीच दुमत नाही. जे. के. र्रोंलग यांच्या कल्पक लेखणीतून उतरलेली हॉग्वर्टची जादुई दुनिया चित्रपटातूनही इतक्या प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर आली की जणू खरंच असं काही विश्व असावं, २० वर्षे उलटूनही हॅरी पॉटरची तीच जादू, लोकप्रियता कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे. काय सगळीकडे नुसतं हॅरी पॉटर… हॅरी पॉटर… एवढं कसलं कौतुक? अशा प्रतिक्रिया कुणीही काढल्या नाहीत हेच हॅरी पॉटरच्या यशामागचे मोठे ‘यश’ आहे. हॅरी पॉटरचं स्टारडम ‘टायटॅनिक’ आणि ‘अवतार’ या सिनेमापेक्षाही जास्त राहिले आहे, अशी अतिशयोक्ती केली तरी चुकीचे ठरणार नाही. जगभरातील घराघरांत हॅरी पॉटरचा चाहतावर्ग निर्माण झाला होता. सिनेमागृहात जाऊन, दूरचित्रवाणीवर आवर्जून पाहणारा तरुण आणि लहान वर्ग ऐन वेळी विरंगुळा म्हणून सीडी आणि डीव्हीडी विकत घेऊन सुट्टीच्या दिवशी, अगदी मोकळ्या वेळी हॅरी पॉटरचे चित्रपट लावून बसत. हॅरी पॉटरची फॅशनही जोरदार लोकप्रिय झाली होती. हॅरी पॉटर खेळणी आज विशी-पंचविशीत असणाऱ्या प्रत्येक मुलामुलीकडे असतीलच. शाळेत जाताना कंपास बॉक्स, पेन्सिल, खोडरबर, वहीवर हॅरी पॉटर आणि त्यांच्या सवगड्यांच्या प्रतिमा तरुण वर्गात चांगल्याच लोकप्रिय होत्या. हॅरी पॉटरचे सातही भाग पाहिले तर बालपण आणि तरुणपणीचे चित्रीकरण, तारुण्यातील मैत्री, मॅलफॉयशी खुन्नस, हॅरी पॉटरचे हळवे आणि उद्ध्वस्त वैयक्तिक आयुष्य, वॉलडोमॉर्डशी झुंज आणि हॅरी पॉटरला मिळणारा हॅर्गिड, रॉन, हर्मायनीचा आधार या जीवनातील संघर्ष व गहिरेपणामुळे किशोरवयीनांना, तरुणांना जोडणारी ही काल्पनिक तरी जवळची वाटणारी कथा होती. त्यातच त्याच्या लोकप्रियतेचे सार आहे आणि याचे सर्व श्रेय जे.के. ररॉंलगच्या लिखाणाचे आहे. त्यांच्या कादंबऱ्या आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. लोकप्रियतेसोबतच समीक्षकांनी, या क्षेत्रातील दिग्गज मंडळींनीही हॅरी पॉटरमधील दिग्दर्शनाचे, अभिनयाचे कौतुक केले.

या रियुनियनच्या निमित्ताने डॅनियल रॅडक्लिफ, रूपर्ट ग्रिंट आणि एम्मा वॉटसन परत एकदा ते हळवे क्षण पुन्हा जागवणार आहेत. फक्त हेच तिघं नाही तर या चित्रपटातील प्रत्येक पात्र चाहत्यांसमोर व्यक्त होणार आहे. प्रोफेसर स्नेप म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अ‍ॅलन रिकमन यांची आठवण सगळ्यांना आल्याशिवाय राहणार नाही हेही निश्चित. तीन दिवसांपूर्वी या रियुनियनचा ट्रेलर प्रकाशित करण्यात आला. डॅनियल रॅडक्लिफ, रूपर्ट ग्रिंट आणि एम्मा वॉटसन यांच्याव्यतिरिक्त हेलेना बोनहॅम कार्टर, रॉबी कोल्ट्रेन, राल्फ फिएनेस, गॅरी ओल्डमॅन, इमेल्डा स्टॉन्टन, टॉम फेल्टन, जेम्स फेल्प्स, ऑलिव्हर फेल्प्स, मार्क विल्यम्स, बोनी राइट, अल्फ्रेड एनोक, मॅथ्यू लुईस, इव्हाना लिंच, ख्रिस कोलंबस हेदेखील या रियुनियला उपस्थित होते. हॅरी पॉटरच्या गोष्टी नव्या स्वरूपात पुन्हा येतील, अशी आशा अजूनही प्रेक्षकांना आहे. त्यांची ती इच्छा पूर्ण होईल तेव्हा होईल, मात्र सध्या हॅरीच्या जुन्या गोष्टी नव्याने आठवून हॉग्वर्टच्या दुनियेचा फेरफटका मारायला काय हरकत आहे?

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2021 at 00:00 IST

संबंधित बातम्या