इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरुद्ध हिंजवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल

बालेवाडीतील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडलेल्या अभिनेता सलमान खान रजनीत वाजविण्यात आलेल्या गाण्यांची परवानगी मिळावी,म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून देण्यात आलेला धनादेश वटला नसल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांकडून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोवेक्स कंपनीचे मोहम्मद सय्यद (वय २९,रा. अंधेरी, मुंबई) यांनी यासंदर्भात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  सलमान खान रजनीचे आयोजक फोरपिलर्स इव्हेंट मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेस कंपनीचे संचालक समीर दिनेश पवानी आणि व्यवस्थापक मनिष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडीतील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलाच्या मैदानावर अभिनेता सलमान खान रजनीचे गेल्या महिन्यात २४ मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे नियोजन फोरपिलर्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून करण्यात आले होते.

नोवेक्स कंपनीकडे यशराज फिल्म्स, झी म्युझिक, इरॉस या कंपन्याचे हक्क आहेत. त्या कंपनीकडून निर्मिती करण्यात आलेल्या चित्रपटातील गाणी जाहीर कार्यक्रमात सादर करण्यासाठी काही रक्कम (रॉयल्टी )भरावी लागते. सलमान खान रजनीसाठी सादर करण्यात येणाऱ्या गाण्यांच्या स्वामित्व हक्कापोटी तीन लाख रुपयांची रक्कम अदा करण्याचे फोर पिलर्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून मान्य करण्यात आले होते. त्यासाठी तीन लाख रुपयांचा धनादेश नोवेक्स कंपनीकडे दिला होता.

मात्र, खात्यात पैसे नसल्याने हा धनादेश वटला नाही. फोर पिलर्स कंपनीकडून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप नोवेक्स कंपनीचे मोहम्मद सय्यद यांनी हिंजवडी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ तपास करत आहेत.