प्रत्येक भारतीय सणांचं आपलं एक महत्त्व आहे. त्यामागे नक्कीच काही तरी विचार आहे. आता आजचंच बघा ना, होळीचा सण, उद्या रंगपंचमी.. मनातील राग, द्वेष, अहंकार, असूया सर्व काही होळीमध्ये भस्मसात करायचं आणि त्यानंतर नव्या रंगांची उधळण करत पुन्हा नव्याने नात्याला सुरुवात करत रंगपंचमी साजरी करायची. होळी-रंगपंचमी हे साऱ्यांचेच आवडते सण, कारण लहानपणापासून या सणातली गंमत अनुभवत आपण मोठे होत असतो. एरव्ही चेहऱ्याला रंग लावून दुसऱ्याची भूमिका रंगवणारे कलाकारही यातून सुटले नाहीत. होळी आणि रंगपंचमीच्या बऱ्याच आठवणींनी अजूनही त्यांच्या मनामध्ये हक्काचे स्थान मिळवले आहे.

प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. सागर कारंडेने माहीमला राहत असतानाच्या होळीची अशीच एक आठवण सांगितली. ‘माहीमची होळी मी कधीच विसरू शकत नाही. जवळपास आठवडाभर या सणाचा आनंद आम्ही लुटायचो. माहीमची होळी सर्वात निराळी. होळीच्या पूर्वसंध्येला आम्ही विरारला जायचो. तिथून सुपारीचे झाड घ्यायचो. ते झाड लोकलच्या बाहेरच्या बाजूला बांधायचो. त्यानंतर माहीम आलं की ते झाड स्थानकावर उतरवायचं आणि तिथून खांद्यावर उचलून ते कॉलनीमध्ये न्यायचो. त्यानंतर खड्डा खणून त्यामध्ये हे झाड लावायचो, ते सजवायचो आणि होलिकामाता म्हणून तिची पूजा करायचो. त्यानंतर रात्रभर बरेच कार्यक्रम व्हायचे. आम्ही गरबा वगैरे खेळायचो आणि सकाळी ५-६च्या दरम्यान ती होळी पेटवली जायची. होळी पेटवल्यावर ते झाड काही वेळाने खाली पडतं, त्यानंतर मग रंगपंचमीला सुरुवात केली जायची. ही अशी होळी माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे सागर सांगत होता.

लहानपणींच्या रंगपंचमीच्या आठवणींना या वेळी सिद्धार्थ जाधवनेही उजाळा दिला. लहान असताना होळी आणि रंगपंचमीची गंमत काही औरच होती. चाळीमध्ये या सणांना धमाल यायची. रंगपंचमीसाठी सकाळी बाहेर पडलो तर संध्याकाळपर्यंत घरीच जायचो नाही. त्यामुळे आईचा ओरडा खायला लागायचा. शाळेतही तीच परिस्थिती, कारण रंगपंचमीचा रंग न गेल्यामुळे शाळेत विविध रंग असलेला चेहरा घेऊनच जायचो. पण हा सण म्हटलं की सर्वात जास्त गंमत आठवते ती ‘आयना का बायना’ची. लहान असताना आम्ही सर्व मित्र चाळीमध्ये ‘आयना का बायना, घेतल्याशिवाय जाईना’ असं म्हणत फिरायचो. या साऱ्या गोष्टींत जी गम्मत होती ती आता येत नाही,’ अशी खंतही सिद्धार्थने व्यक्त केली.

रंगपंचमी हा सर्वात आवडता सण असल्याचं संजय नार्वेकरने सांगितले. त्यामुळे या दिवशी कधीही प्रयोग ठेवत नाही, हेदेखील त्याने स्पष्ट केलं. तर संतोष पवारने रंगपंचमीच्या दिवशी प्रयोग असला की लपत-छपत इमारतीबाहेर पडावं लागायचं, अशीही आठवण सांगितली.

रंगपंचमीचा सण आहे आणि भांग नाही म्हटल्यावर कसं चालेल? काही रंगकर्मीना रंगपंचमीच्या दिवशी नकळतपणे भांग पाजली गेली आणि त्यानंतर काहींची झालेली गंमत तर काहींनी या गोष्टींचा केलेला सामनाही रंजक असाच.

आनंद इंगळेच्या बाबतीत असाच एक किस्सा घडला. एका रंगपंचमीचा किस्सा मी कधीही विसरू शकत नाही. दुपारी साडेचार वाजता नाटकाचा प्रयोग होता. त्यामुळे सकाळी कलाकारांच्या रंगपंचमीला गेलो. रंगपंचमी खेळून दुपारी आराम करून प्रयोगाला जायचं मी ठरवलं होतं. रंगपंचमीची मजा लुटत असताना मित्रांना रंग लावत असताना मी त्यामध्ये पार बुडून गेलो. त्यामध्ये कुणी तरी मला नकळतपणे भांग पाजली. ती भांग असल्याचं मला कळलंदेखील नाही. त्यानंतर काय होत होतं नेमकं कळत नव्हतं. रंगांनी माखून निघाल्यावर थेट नाटकासाठी मी निघालो. चेहऱ्यावर, कपडय़ांवर सर्व रंगच रंग. त्याच अवस्थेत नाटक सुरू केलं. नाटक हाऊसफुल्ल होतं. पण त्या वेळी मी काय आणि कसं काम केलं, हे सांगता येणार नाही, अशी गमतीशीर आठवण आनंदने सांगितली.

भाऊ कदमलाही प्रयोगाच्यावेळी एकदा भांग पाजली होती, असा किस्सा त्याने स्वत:च सांगितला. लहानपणी रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला, पण कालांतराने ही गंमत कमी होत गेली. मी ‘यदा कदाचित’ नाटकात होतो. रंगपंचमीच्या दिवशी नाटकाचा दौरा होता. प्रयोग झाला. त्यानंतर कुणी तरी मला मसाले दूध प्यायला दिलं, त्यानंतर गोडाचे पदार्थही खायला दिले. भांग आणि त्यावर गोडपदार्थ खाल्ला की ग्लानीमुळे काही सुचत नाही, असं म्हणतात. थोडय़ा वेळाने मला सांगण्यात आलं की ते मसाले दूध नव्हतं तर भांग होती. साऱ्यांना मला बुचकळ्यात टाकून गंमत पाहायची होती. पण सुदैवाने माझ्यावर त्या भांगेचा कोणताही परिणाम झाला नाही, असं भाऊ सांगत होता.

अभिनेता पुष्कर श्रोत्रीनेही या वेळी लहानपणीच्या रंगपंचमीच्या आठवणींना उजाळा दिलाच, पण कॉलेज जीवनात भांग प्यायल्यावर झालेली गंमतही सांगितली. कॉलेजच्या दिवसांमध्ये एकदा रंगपंचमी खेळून झाल्यावर मित्रांनी अजाणतेपणे भांग प्यायला दिली. त्यानंतर माझ्याबरोबर नेमकं काय होत होतं, हे सांगता येणार नाही. मित्रांबरोबर मजा केल्यावर घरी आलो. घरात गेलो तेच हसत-हसत. कुणी काही बोललं की मी हसायचो. किचनमध्ये काही झालं तरी मी हसायचो. कुणी घरी आलं की दरवाजा उघडून हसत राहायचो. काही झालं तरी मी हसत होतो आणि घरचे माझ्यावर हसत होते, अशी आठवण पुष्करने सांगितली.

रंगकर्मीची रंगपंचमी एकदम झोकात होते. सारेच जण तो दिवस राखीव ठेवून आपल्या मित्रांना भेटतात आणि सणाचा आनंद लुटतात. पण यामध्ये काय चांगल्या गोष्टी घडतात हे सागर कारंडे सांगत होता. रंगकर्मीच्या होळीला मी आवर्जून जातो. फक्त कलाकार नाहीच तर तंत्रज्ञ, पडद्यामागे काम करणारे सारेच कलाकार भेटतात. पण यामधली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, एकमेकांना रंग लावत असताना आपल्या मनातला राग, द्वेष, असूया सारेच विसरतात. या गोष्टींचा मी साक्षीदार आहे. रंगात न्हाऊन निघत असताना सारे एक होऊन जातात. साऱ्या रंगात एकीचा रंग दिसतो आणि हेच अपेक्षितही असावं. त्यामुळे ही रंगपंचमी कधीही न चुकवावी अशीच, असं सागर सांगत होता.

होळी-रंगपंचमीवरची गाणी बरीच. पण हा अनुभव ऐकल्यावर शोले चित्रपटातलं ‘होली के दिन दिल मिल जातें हैं, रंगो में रंग मिल जातें हैं, गिले शिकवे छोडम्के दोस्तो, दुश्मन भी गले मिल जाते हैं’ हे गाणं आठवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मनातल्या सगळ्या वाईट गोष्टी दूर सारून एकत्र या आणि या सणाचा मनमुरादपणे आनंद लुटा.