चीनच्या वुहान शहरामधून फैलाव झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगात हातपाय पसरले आहेत. चीनसह भारत, अमेरिका, इटली, इराण यासारखे देश करोनाचा फैलाव रोखण्यासाठी  वेगवेगळे उपाय करत आहेत. परंतु तरीदेखील या देशांमधील काही नागरिकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. यामध्येच आता हॉलिवूडमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या वडिलांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या अभिनेत्रीने स्वत: ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

‘ट्रान्सफर्मर्स’ आणि ‘मॅन्सफिल्ड पार्क’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री सोफिया माइल्स साऱ्यांच्याच लक्षात असेल. याच सोफिया माइल्सच्या वडिलांचं करोना विषाणूमुळे निधन झालं आहे. वडिलांच्या निधनामुळे सोफियाला प्रचंड धक्का बसला असून तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“माझे वडील पीटर माइल्स यांच्या आत्म्यास शांती लाभो. काही तासांपूर्वीच माझ्या वडिलांचं निधन झालं आहे. करोना विषाणूमुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे”, असं ट्विट सोफियाने केलं. तिच्या या ट्विटनंतर अनेकांनी तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, करोना विषाणूचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत अनेक जणांना करोना विषाणूची लागण झाली असून यात काही सेलिब्रिटींचादेखील समावेश आहे. हॉलिवूडमधील अभिनेता टॉम हॅक्स आणि त्याची पत्नी, अभिनेत्री रिटा विल्सन, एडरिस एल्बा, राशेल मॅथ्यू यांचा समावेश आहे. तर भारतात बॉलिवूड अभिनेत्री कनिका कपूरला करोना झाल्याचं समोर येत आहे.