गेल्या वर्षी भारतात प्रदर्शित झालेल्या हॉलीवूडपटांची ४५० कोटींची कमाई
दरवर्षी भारतात प्रदर्शित होणाऱ्या हॉलीवुडपटांच्या संख्येत १ ते २ टक्क्याने वाढ झाली आहे. त्यांची गल्लापेटीवरील कमाईही वाढली आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या हॉलीवुडपटांनी ४५० कोटींची कमाई केली आहे. २०१४ तुलनेत गेल्या वर्षी उत्पन्न दुपटीने वाढले आहे.
हॉलीवुडचे सुपरहिरोपट, ‘माव्‍‌र्हल’ पट, बाँडपटांची मालिका किंवा अ‍ॅनिमेशनपट यांचे वेड जगभरातील प्रेक्षकांप्रमाणेच भारतातील प्रेक्षकांनाही आहे. असे असूनही जेव्हा व्हिन डिझेलच्या ‘फास्ट अँड फ्युरिअस ७’ ने जेव्हा १०० कोटी रुपयांची कमाई केली तेव्हा बॉलीवुडसह सर्वसामान्य प्रेक्षकांच्याही भुवया उंचावल्या. पाठोपाठ ‘ज्युरासिक वर्ल्ड’ या चित्रपटानेही १०० कोटींचा आकडा पार केला. याआधी ज्या हॉलीवुडपटांची कमाई इथे १० कोटी रुपयांच्या आतमध्ये होती तेच चित्रपट गेली दोन वर्ष ३० ते ८० कोटींच्या दरम्यान कमाई करत आहेत. हा बदल सहज झालेला नाही. आंतरराष्ट्रीय निर्मितीसंस्था, हॉलीवुडपटांचे वितरक आणि मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांनी व्यवस्थित नियोजन करून या चित्रपटांचे मार्केटिंग केले आहे. ‘पीव्हीआर’ सारख्या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांचा यात मोठा वाटा आहे, अशी माहिती ट्रेड विश्लेषक गिरीश वानखेडे यांनी दिली.
हॉलीवुडच्या दर्जाचे सुपरहिरो पट, अ‍ॅक्शनपट किंवा वेगळ्या संकल्पनांवरचे त्यांचे चित्रपट आपल्याकडे तयार व्हायला खूप काळ जावा लागेल. या गोष्टी लक्षात घेऊन भारतीय वितरकांनी केवळ इंग्रजी भाषेत नव्हे तर हिंदी, मल्याळम, तेलुगू अशा प्रादेशिक भाषांमध्ये हॉलीवुड उपलब्ध करून दिले. या सगळ्याचा परिणाम हॉलीवुडपटांचे येथील उत्पन्न वाढण्यावर झाला असल्याचे स्पष्ट करतानाच वितरक म्हणून दोन वर्षांमध्ये ५२ हॉलीवुडपट वितरित केल्याची माहिती वानखेडे यांनी दिली. गेल्या वर्षी ‘अ‍ॅव्हेंजर्स : एज ऑफ अल्ट्रॉन’ या माव्‍‌र्हलपटाने ७३ कोटी रुपये, ‘मिशन इम्पॉसिबल : रॉग नेशन’ने ६७ कोटी रुपये तर ‘स्पेक्टर’ या बॉंडपटाने ४० कोटी रुपयांची कमाई केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood movies hit on box office
First published on: 01-02-2016 at 00:59 IST