भारताच्या इतिहासाची चर्चा होते तेव्हा ‘रामायण’ आणि ‘महाभारत’चा उल्लेख होणं साहजिक आहे. त्याशिवाय आपला इतिहास पूर्ण होत नाही. पौराणिक कथांमध्ये ‘महाभारत’ आणि ‘रामायण’चं अनन्य साधारण महत्त्व आहे. या पुराणकथा प्रेक्षकांसमोर आणल्या त्या रामानंद सागर आणि बी.आर. चोप्रा यांनी. एकीकडे रामानंद सागर यांनी रामायणाची निर्मिती केली तर दुसरीकडे बी.आर. चोप्रा यांनी महाभारत प्रेक्षकांच्या भेटीला आणलं. यामध्ये रामायणाची चर्चा तर कायम होतेच. मात्र बी.आर.चोप्रा यांच्या महाभारतानेदेखील छोट्या पडद्यावर इतिहास रचला आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार, मालिकेची कथा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. विशेष म्हणजे या मालिकेचं शीर्षकगीत हे प्रेक्षकांच्या जास्त पसंती उतरलं. मात्र हे गाणं नेमकं कसं चित्रीत झालंय हे कोणाला माहित आहे का? त्यातच सध्या सोशल मीडियावर या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
‘महाभारत’चं ते शीर्षकगीत ज्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या गाण्याने केवळ प्रेक्षकांची मनचं जिंकली नाहीत. तर महाभारताचा इतिहास प्रेक्षकांच्या मनावर कोरला. त्यामुळे या गाण्याची निर्मिती नेमकी कशी झाली याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्यातच सध्या सोशल मीडियावर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिकांचा ट्रेण्ड सुरु आहे. यात महाभारतच्या थीम साँगचं बिहाइंड द सीनदेखील व्हायरल होत आहेत.
या गाण्याचं निर्मिती संगीत दिग्दर्शक राज कमल यांनी केली असून स्टुडीओमध्ये ते या गाण्याची निर्मिती करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या गाण्याला ज्या गायकाचे स्वरसाज लाभले ते महेंद्र कपूरदेखील यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या शीर्षकगीताचं एक खास वैशिष्ट आहे. ते म्हणजे महाभारतातील प्रत्येक घटना त्यांनी या गाण्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच मालिकेतील प्रत्येक महत्त्वाच्या घटनेनंतर एक खास गाणं लावलं जाई. त्यामुळे ही मालिका आणि त्याचं शीर्षकगीत त्याकाळी चर्चेत होतं.
दरम्यान, त्या काळी व्हिडीओमध्ये फारसे इफेक्टस वापरले जात नव्हतं. मात्र तरीदेखील राज कमल यांनी उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीच्या आधाराने हे गाणं उत्तम करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला. हे गाणं प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावलं.