टेलिव्हिजनवरील ‘सीआयडी’ या प्रसिद्ध मालिकेने २१ जानेवारीला १९ वर्षे पूर्ण केली. जवळपास दोन दशकं टेलिव्हिजनवर चालणारी आणि सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिलेली ही एकमेव मालिका असेल. आतापर्यंत कोणतीच मालिका इतके वर्ष चाललेली नाही. मालिकेतील एसीपी प्रद्मुम्न सारखी भूमिका एका कलाकाराने इतकी वर्ष करण्याचाही हा रेकॉर्ड आहे. एसीपी प्रद्मुम्न ही व्यक्तिरेखा दिग्गज अभिनेते शिवाजी साटम हे साकारत होते. ‘सीआयडी’ मालिकेच्या पहिल्या भागाचे प्रसारण २१ जानेवारी १९९८ रोजी झाले होते. कोणताही कट न घेता सलग १११ मिनिटे भाग दाखविण्याचा रेकॉर्डही या मालिकेच्या नावावरून असून त्याची नोंद ‘गिनीज बुक’मध्ये करण्यात आलेली आहे. १५ जानेवारी २०१७ रोजी या मालिकेचा शेवटचा एपिसोड दाखविण्यात आला.

शिवाजी साटम यांनी नवभारत टाइम्स या संकेतस्थळाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले की, छोट्या पडद्यावरील प्रदीर्घ काळ चालणा-या मालिकेचा भाग असल्याचा मला आनंद आहे. आम्ही जो प्रवास सुरु केला होता तो खूप दूरपर्यंत गेला. ही मालिका इतकी वर्ष चालेल असा मी विचारही केला नव्हता. फार फार तर दोन वर्ष मालिका चालेल असे मला वाटत होते. पण, जशी ही मालिका सुरु झाली आणि त्याचे एकावर एक एपिसोड झाले, लोकांच्या मनात त्याबद्दल विश्वास निर्माण झाला. तेव्हा अजून दोन वर्ष मालिका चालेल असे मला वाटले. पण, आज या मालिकेला जवळपास २० वर्ष झाली.

इतकी वर्ष एकच भूमिका साकारून तुम्हाला कंटाळा नाही का आला? असा प्रश्न केला असता साटम म्हणाले की, अजिबात नाही. उलट मला मजा आली. यात कंटाळा येण्यासाठी मला कधी वेळच मिळाला नाही आणि असं जर झालं असतं तर मी दोन-तीन वर्षातच मालिका सोडून दिली असती. माझ्या मनाला  न भावलेल्या भूमिका मी आजवर कधीच साकारल्या नाहीत. चित्रपटांमध्येदेखील मला आवडतील अशाच भूमिका मी साकारल्या आहेत. सीआयडी मालिकेच्या यशाचे संपूर्ण श्रेय साटम हे दिग्दर्शक आणि निर्माता बीपी सिंह यांना देतात. या मालिकेच्या चित्रीकरणाची सुरुवात मुंबईत झाली होती आणि आजही त्याचे चित्रीकरण मुंबईतच होत होते. दरम्यान, काही वेळा याचे चित्रीकरण दिल्ली, जयपूर, कोलकाता, मनाली, चेन्नई, शिमला, जोधपूर, जैसलमेर, गोवा, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर आणि आग्रा यांसारख्या ठिकाणी देखील करण्यात आले.