रेश्मा राईकवार

तो प्रेमकथांच्या प्रेमात असलेला दिग्दर्शक. ‘सोचा न था’ या त्याच्या पहिल्या चित्रपटापासून ते अगदी अलीकडे प्रदर्शित झालेल्या नव्या ‘लव्ह आजकल’पर्यंत त्याच्या प्रत्येक चित्रपटातून त्याने वेगवेगळय़ा काळ, प्रांत, परिस्थितीतील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या प्रेमाचे पैलू रंगवले आहेत. मात्र ओटीटीसारख्या नव्या माध्यमात वावरताना नेटफ्लिक्सवर इम्तियाज लिखित ‘शी’ ही वेबमालिका असो वा नुकतीच सोनी लिव्हवर प्रदर्शित झालेली त्याचेच लेखन आणि प्रस्तुती असलेली ‘डॉ. अरोडा – गुप्तरोग विशेषग्य’ ही नवी वेबमालिका पाहिली तर हा प्रेमकथांचा बादशहा पुन्हा वेगळा भासू लागतो. प्रेमरोग ते गुप्तरोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरची कथा रंगवणारा हा दिग्दर्शक, मला प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा पैलू सापडतोच, असं तितक्याच प्रेमाने सांगतो.

swatantra veer savarkar budget
रणदीप हुड्डाने ज्यासाठी मालमत्ता विकली, त्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचं मूळ बजेट किती? जाणून घ्या
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

नेटफ्लिक्सवर एका महिला पोलीस अधिकाऱ्याची कथा रंगवणारी ‘शी’ ही वेबमालिका चांगलीच गाजली. या वेबमालिकेचा विषय आणि त्याची मांडणी पाहिली तर त्याचं लेखन इम्तियाज अलीचं आहे यावर विश्वास बसत नाही. त्यात जेव्हा खुद्द इम्तियाजने ‘डॉ. अरोडा – गुप्तरोग विशेषग्य’ या वेबमालिकेची घोषणा केली तेव्हाही त्याच्या चाहत्यांना असाच धक्का बसला होता. गुप्तरोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरची कथा या वेबमालिकेत पाहायला मिळते. मात्र त्याअनुषंगाने प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाची असलेली गोष्ट म्हणजे त्याची लैंगिकता. लैंगिक इच्छा-आकांक्षा पूर्ण करताना येणाऱ्या अनेक शारीर अडचणींमुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कित्येक स्त्रियांचे विनाकारण मानसिक खच्चीकरण होते, किती तरी समस्यांचा रोजच्या रोज समाजातील कित्येकांना सामना करावा लागतो आहे आणि तरीही या गोष्टींवर बोललं जात नाही. डॉक्टरची वा वैद्यकीय मदत घेतली जात नाही. माणसं निमूट त्रास सहन करतात. यावर काही तरी लिहिलं पाहिजे, हा विषय लोकांपर्यंत पोहोचायला हवा, असा विचार माझ्या मनात आला आणि त्यातून ‘डॉ. अरोडा – गुप्तरोग विशेषग्य’चा जन्म झाला, असं इम्तियाजने सांगितलं. अर्थात, हा विषय व्यापक असला तरी यातही प्रेमाची गोष्ट आहे. मला प्रत्येक गोष्टीत प्रेम दिसतं, असं तो म्हणतो.

‘कोण्या एका महापुरुषाने सांगितलं आहे की, प्रत्येक गोष्ट ही प्रेमाची गोष्टच असते. मग कधी ते प्राण्यावरचं प्रेम असतं, कधी वस्तूंवरचं असतं, तर कित्येकदा आपण स्वत:वरच प्रेम करत असतो. त्यामुळे प्रेमाचे पैलू बदलतात, संदर्भ बदलतात. या वेबमालिकेतही एक नाही अनेक प्रेमकथा आहेत, मात्र मला आजपर्यंत चित्रपटातून जे सांगता आलं नाही, मांडता आलं नाही ते या वेबमालिकेतून मांडण्याची संधी मला ओटीटीमुळे मिळाली आहे,’ अशा शब्दांत त्याने आपला आनंद व्यक्त केला. जगभरात प्रेमाची भावना ही सारखीच आहे, काळानुसार प्रेमामुळे निर्माण झालेले नातेसंबंध बदलत राहतात. सुरुवातीच्या काळात मुली फार जाहीरपणे प्रेम व्यक्त करू शकत नव्हत्या, आज त्या बेधडक प्रेमाची कबुली देतात. पूर्वी त्या लाजत होत्या, आता त्या लाजत नाहीत आणि तरीही मुलांना त्यांचं आपल्या आयुष्यात असणं महत्त्वाचं वाटतं. हे कोणी तरी आपलं हवंसं वाटणं, त्यावर जीव उधळून द्यावासा वाटणं, ही प्रेमभावना आजही तशीच आहे आणि माझ्या आत्तापर्यंतच्या चित्रपटातून त्या त्या संदर्भासह मी प्रेमाचे पैलू मांडण्याचा प्रयत्न करत आलो आहे, असं तो म्हणतो.

कला ही आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेली असते, असं तो म्हणतो. एक व्यक्ती म्हणून माझ्या आजूबाजूची माणसं, भवताल, घटना समजून घेणं मला महत्त्वाचं वाटतं. जे मी अनुभवलं आहे तेच मी इतरांपर्यंत कलेच्या माध्यमातून पोहोचवत असतो. चित्रपट हे आपल्या आयुष्याशी जोडलेले असतात ते असे.. कारण मी एक लेखक आहे – दिग्दर्शक आहे हे सगळं नंतर येतं. मुळात मी एक माणूस आहे. मला जगण्याचा रसरशीत अनुभव घेता आला पाहिजे. माझ्यातील माणसाला ते आधी अनुभवता आलं पाहिजे तेव्हाच ते माझ्या लेखनातून-दिग्दर्शनातून उतरेल, असं सांगतानाच रोजच्या निरीक्षणातूनच आपली पात्रं रंगवायला आवडत असल्याचं तो स्पष्ट करतो.

‘ओटीटी’मुळे आपल्याला हवे ते विषय पुरेसा वेळ घेऊन मांडण्याचं स्वातंत्र्य चित्रपटकर्मीना मिळालं आहे. त्याचबरोबरीने या माध्यमामुळे चित्रपट वा कोणत्याही कलाकृतीचं वारसामूल्य वाढलं आहे. मी केलेला कोणताही चित्रपट चांगला असला तरी तो फार कमी काळ चित्रपटगृहातून पाहायला मिळतो. हिट झाला तर तो कधी तरी पुढे पाहता येतो, नाही तर डब्यात जातो. कोणी पाहू शकत नाही. किती तरी मोठमोठय़ा दिग्दर्शकांचे खूप चांगले चांगले चित्रपट आज कुठेच पाहायला मिळत नाहीत. त्यांचे त्यांना सापडत नाहीत. माझा मित्र सुधीर मिश्रा.. त्याचा एक खूप सुंदर चित्रपट होता, ‘यह वो मंजिल तो नहीं’ नावाचा.. तो मला कुठेच मिळत नाही. सुधीरकडेही नाही आहे. ओटीटीमुळे माझे चित्रपट आज कुठल्या ना कुठल्या माध्यमावर उपलब्ध आहेत. लोकांना ते पाहता येतील, हा विश्वास मला आनंददायी वाटतो.

-इम्तियाज अली