लैंगिक गैरवर्तणुकीसारखे गंभीर आरोप असलेल्या दिग्दर्शक साजिद खानवर भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संघटनेनं (IFTDA) निलंबनाची कारवाई केली आहे. महिन्याभरापूर्वी या संघटनेनं साजिद खानला नोटीस पाठवली होती. स्वत:ची बाजू मांडण्याची वेळ साजिदला दिली गेली असूनही त्यानं त्या प्रकरणावर मौन धारण करणं पसंत केलं त्यामुळे साजिदवरील गंभीर आरोप पाहता त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे.

रेचल व्हाइट, करिश्मा उपाध्याय, सलोनी चोप्रा, सिमरन सुरी या चौघींनी साजिदविरोधात IFTDA कडे तक्रार केली होती. या चारही महिलांनी साजिदनं असभ्य वागणूक, लैंगिक गैरवर्तणुक, शरिरसुखाची मागणी, मानसिक छळ केल्याची तक्रार केली होती. तसेच सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. या पोस्टनंतर साजिद खानवर देशभरातून कडाडून टिका झाली होती. अक्षय कुमार, रितेश देशमुख यांनी साजिदसोबत काम करण्यास नकार दिला होता, तर स्वत: साजिदनं नैतिक जबाबदारी स्वीकारत हाऊसफुल्ल ४ चं दिग्दर्शक पदही सोडलं होतं.

या संपूर्ण प्रकरणानंतर साजिद खानला IFTDAनं नोटीस पाठवली होती. या नोटीसीला साजिदनं उत्तरही दिलं होतं. ‘लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे माझ्या करिअरचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे माझी बहिण आणि आईलाही यामुळे अतोनात दु:ख झालं आहे. माझ्यावर झालेले आरोप मला मान्य नाही. पण एकच बाजू ऐकून त्यावर कोणतंही मत तयार करू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो. यासाठी कोणत्याही प्रकारचं साहाय्य करायला मी तयार आहे’ असं त्यानं या नोटीसीत म्हटलं होतं.

मात्र वेळ देऊनही त्यानं स्वत:ची बाजू मांडली नाही. त्यामुळे लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप, शरीरसुखाची मागणी करणं, गैरफायदा घेणं, असभ्य वर्तन करणं यासारख्या आरोपांमुळे त्यांच्यावर कारवाई करत असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे.