बॉलिवूडमध्ये आपल्या अदाकारीने घायाळ करणारी आणि प्रसारमाध्यमांच्या मथळ्यांनी चर्चेत राहणारी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिने पत्रकारितेचे शिक्षण घेतल्याचे फारच कमी लोकांना माहित असेल. पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर जॅकलीनने श्रीलंकेत पत्रकार म्हणून काम देखील केले होते. नुकताच तिच्या आईने जॅकलीनचा पत्रकारिता करतानाचा जुना व्हिडिओ तिला पाठवून पत्रकारितेच्या दुनियेतील आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर जॅकलीनने देखील हे दिवस अद्याप विसरले नसल्याचे बोलून दाखविले. आईने पत्रकारितेच्या दिवसांना उजाळा दिल्यानंतर पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनुभव अविस्मरणीय असल्याचे जॅकलीन म्हणाली. फिल्डवर टीमसोबत काम करणे हे प्रत्येक दिवशीचे साहसी काम असायचे, अशा शब्दांत तिने पत्रकारिता क्षेत्राविषयीची आत्मियता व्यक्त केली. रोज नवीन घडामोडींवर नजर ठवण्याचे काम हेरगिरीसारखे होते, त्यामुळे ते दिवस मी कधीही विसरु शकत नाही, असे जॅकलीनने एका मुलाखतीवेळी सांगितले.

आपल्या पत्रकारित्याच्या आठवणीला उजाळा देताना जॅकलीन म्हणाली की, मला नेहमीच अभिनयाच्या क्षेत्राविषयी आकर्षण होते. त्यामुळे मी अभिनेत्री होण्याचे स्वप्न बाळगून होते. मात्र श्रीलंकेसारख्या देशात माझे हे स्वप्न फारच मोठे असल्याचे वाटायचे, असे जॅकलीनने सांगितले. पत्रकारितेच्या क्षेत्रातून मॉडेलिंग क्षेत्रात आल्यानंतर २००६ मध्ये जॅकलीनने मिस युनिव्हर्स श्रीलंका ताज पटकाविला होता. अर्थातच मिसयुनिवर्सनंतर जॅकलीनसाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले होते. दरम्यान जॅकलीनने चित्रपटामध्ये पत्रकाराची भूमिका करण्याची उत्सुकता देखील बोलून दाखवली. मी पत्रकार म्हणून फिल़्डवर काम केले असल्यामुळे अशा भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेन, असा विश्वासही तिने व्यक्त केला. मी अशा व्यक्तिरेखेत चांगले काम करु शकते असे ती म्हणाली.
जॅकलीनच्या आगामी चित्रपटाविषयी बोलायचे तर, आगामी ‘रिलोड’ या चित्रपटातून जॅकलीन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी केले असून सदर चित्रपटाच्या चित्रिकरणाचा शेवट अगदी दमदार पद्धतीने करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये सिद्धार्थच्या प्रेयसीची भूमिका साकारणाऱ्या जॅकलीनने पोल डान्स करून चित्रिकरणाची सांगता केली. ‘चंद्रलेखा’ असे बोल असलेल्या गाण्याचे मुंबईत चित्रिकरण झाले. सदर गाण्यासाठी नाइटक्लबचे वातावरण असणारा सेट उभारण्यात आला होता. रुपेरी पडद्यावर आपला पोल डान्स अधिक प्रभावी वाटावा यासाठी जॅकलीनने चित्रीकरणापूर्वी सदर नृत्यशैलीचे प्रशिक्षण घेतले. या गाण्यात जॅकलीन तिच्या मोहक अदांनी सिद्धार्थला घायाळ करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. ‘चंद्रलेखा’ या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन आदिल शेख याने केले आहे.