जम्मू आणि काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या हस्ते ‘सरगोशिया’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. या कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मेहबुबा मुफ्ती यांनी काश्मीर खोऱ्यात फिल्मसिटी निर्माण करण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलून दाखवले. फिल्म सिटीच्या निर्मितीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ‘ओमकारा’ चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर छोटा भाऊ तस्तादक हुसैन श्रीनगरच्या जवळील गावात फिल्म सिटीची निर्मिती करण्यासंदर्भात बोलला होता. फिल्मसिटीमुळे काश्मीर खोऱ्यातील तरुणाईला एक वेगळी ओळख मिळण्यास मदत होईल. एवढेच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भारतीयांना देखील काश्मीर खोऱ्यात सुरक्षित असल्याची खात्री वाटेल. यावेळी मेहबुबा मुफ्ती यांना काश्मीरचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून कोणता चेहरा अधिक पात्र वाटतो, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर मेहबुबा मुफ्ती यांनी सलमान खानच्या नावाला पसंती दिली. अर्थात जर जम्मू काश्मीरमध्ये भविष्यात फिल्मसिटी झाली तर सलमान खान सदिच्छा दूत असेल, असे संकेतच मेहबुबा मुफ्ती यांनी दिले आहेत.

इमरान खानच्या आगामी ‘सरगोशिया’ चित्रपटात अभिनेत्री फरिदा जलाल काश्मिरी महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहेत. इमरान खान आणि अभिनेत्री फरिदा जलाल यांच्यासोबतच ‘सरगोशिया’ चित्रपटात अलोक नाथ, इंद्रनील सेन गुप्ता अदिती भाटीया हे कलाकार देखील असतील. हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडमध्ये सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. काश्मीर खोऱ्यातील फिल्म सिटीविषयी बोलताना मेहबुबा यांनी सलमानच्या नावाला पसंती दिल्याने सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलमान खान सध्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमात व्यग्र आहे. या चित्रपटात तो एका रॉ एजंटची भूमिका साकारणार असून, या सिनेमाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ‘एक था टायगर’ या सिनेमाचा सिक्वल असणाऱ्या या सिनेमाची आतापासूनच चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेला सलमानच्या या सिनेमातील लूकमुळे ‘टायगर जिंदा है’बद्दलची उत्सुकता वाढताना दिसले होते.