बॉलीवूडचा खिलाडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी २’ हा चित्रपट काल सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा केवळ २५ टक्के प्रतिसाद चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळाला. खरं तर शुक्रवारी कोणतीही सार्वजनिक सुट्टी नसल्यामुळे चित्रपटाला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद मिळाल्याचे म्हटले जातेय.

प्रदर्शनापूर्वी कायदेशीर बाबींमुळे चर्चेत आलेल्या अक्षय कुमारच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी १३.२० कोटींचा गल्ला जमविला आहे. प्रसिद्ध व्यापार आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट केलेये की, ‘जॉली एलएलबी २’ने पहिल्या दिवशी १३.२० कोटींची कमाई केली आहे. शनिवार आणि रविवारी चित्रपटाला अजून चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद मिळेल. ‘जॉली एलएलबी २’ची कथाही कोर्टातील एका केसभोवती गुंफण्यात आलीये. लखनऊमधील रहिवासी जगदिश्वर मिश्र (अक्षय कुमार) याला वकिलीच्या करिअरमध्ये मोठं काहीतरी करायचं आहे. पण घरच्या स्थितीमुळे त्याला एका ज्येष्ठ वकिलाच्या कार्यालयात दुय्यम स्वरुपाचं काम करावं लागतं. पण त्याच्यातील जिद्द कायम आहे. लखनऊमधील न्यायालयात स्वतःच स्वतंत्र चेंबर असावं, अशी इच्छा त्याची असते. त्यासाठी लागणारा पैसाही त्यानं जमवलेला असतो. पण ऐनवेळी तो कमी पडतो. मग खोटं बोलून तो न्यायालयात त्याला रोज भेटणाऱ्या आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या एका महिलेची फसवणूक करून तिच्याकडून पैसे घेतो. यानंतर काय घडते. त्यातून पुढे कथानकाला कशी वळणे मिळतात. खुद्द जगदिश्वर मिश्र याच्यावर काय काय संकटे कोसळतात… या सगळ्यातून ‘जॉली एलएलबी २’ची कथा पुढं जाते आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

प्रदर्शनापूर्वी या चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे कोर्टाभोवती आधारित असणाऱ्या अक्कीच्या या कहाणीला कोर्टासमोर परिक्षा द्यावी लागली होती. न्यायालयाने अखेर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आक्षेपार्ह दृश्य वगळण्याची तयारी दर्शविल्यानंतर ‘जॉली एलएलबी २’  प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता. या चित्रपटातील चार दृश्ये वगळण्यात आली आहेत. दरम्यान, त्यावेळी न्यायालयाच्या निर्णयावर अक्षय कुमारही समाधानी होता. न्यायालयाचा आदर असून न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचे अक्षयने म्हटले होते. चित्रपटातील बूट फेकल्याच्या आणि स्कूटरवर चढण्याच्या दृश्यासह कोर्टातील आक्षेपार्ह संवाद वगळून हा चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी औरंगाबादच्या खंडपीठाने दिली होती. अक्षयचा हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. अक्षय कुमार, हुमा कुरेशी आणि अन्नू कपूर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.