‘कबाली’ है यह.. म्हणत स्टाइलमध्ये झालेली सुपरस्टार रजनीकांत यांची एन्ट्री, त्यांच्या प्रवेशासाठी डॉन स्टाइल संगीत आणि त्यांच्या अॅक्शन्स असा सगळा मसाला घेऊनच चित्रपट आपल्या वाटय़ाला येतो. नाही म्हणायला मलेशियातील तमिळ लोकांना समान वेतन देण्यासाठीच्या लढाईची कथा जोड म्हणून देण्याचा प्रयत्न इतका तोकडा पडला आहे की तो धड रजनीपटही उरलेला नाही.
वीस वर्षे तुरुंगातून परत आलेल्या कबालीला (रजनीकांत) एकेकाळची त्याची अर्धवट राहिलेली लढाई नव्या पिढीसाठी नव्याने सुरू करावी लागते. भारतीयांना गुलाम म्हणून वापरण्याचा प्रघात जुनाच त्यामुळे कितीही काळ बदलला तरी तो वेगवेगळ्या स्वरूपांत समोर येत राहतो. तारुण्यात चांगलं शिक्षण घेऊन नोकरीला लागलेला कबाली मलेशियातील तमिळ लोकांनाही चिनी आणि इतर लोकांप्रमाणे समान वेतन मिळावे, यासाठी बंड पुकारतो. रामशास्त्री हे या लढय़ाचे अध्वर्यू. कबालीला लढय़ात मिळालेले यश पाहून रामशास्त्री पूर्ण मलेशियात ही चळवळ मोठी करण्यासाठी त्याला आपल्याबरोबर बोलवतात. मात्र हा लढा लढत असताना ड्रग्जचा व्यापार, देहविक्री या व्यवसायात ही गँग कधीही सामील होणार नाही, हा रामशास्त्री आणि पर्यायाने कबालीचाही दंडक असतो. या नियमातून पळवाटा काढणाऱ्यांसाठी रामशास्त्री ही डोकेदुखी ठरते. त्यांचा काटा काढला जातो आणि अचानक सगळी सूत्रे कबालीच्या हातात येतात. बंडासाठी उभा राहिलेला एक सुशिक्षित तरुण एका गँगचा बॉस होतो. पण मलेशियात ड्रग्ज आणि मुलींचा व्यापार करणाऱ्या टोनी ली, विजय सिंह या गँगसाठी कबाली हा मोठा अडथळा ठरला आहे. कबालीचा काटा काढण्यासाठी त्याच्याच जवळच्यांच्या साथीने त्याच्या गर्भवती पत्नीची (राधिका आपटे) हत्या केली जाते, कबालीला अनेक आरोपांखाली तुरुंगात पाठवले जाते. या सगळ्यानंतर वीस वर्षे तुरुंगवास भोगून परतलेल्या कबालीला पुन्हा एकदा भारतीयांची तरुण पिढी नशेच्या विळख्यात कशी अडकते, त्यांचा या व्यापारासाठी कसा वापर केला जातो हे विदारक चित्र दिसते. आणि त्याची लढाई पुन्हा सुरू होते.
चित्रपटाची ही कथाकल्पना वरवर वेगळी वाटत असली तरी पूर्वार्धात या नाटय़ापर्यंत पोहोचलेला चित्रपट त्यानंतर मात्र मनमोहन देसाईंच्या चित्रपटांप्रमाणे बिछडे हुए पती-पत्नी, त्यांची मुलं या स्टाइलने फिरत राहतो. कबालीचा अर्धा वेळ मध्यांतरानंतर पहिल्यांदा मुलगी (धन्सिका) आणि नंतर पत्नी यांच्या शोधात आणि मग उर्वरित वेळ टोनी ली आणि गँगला सुडासाठी संपवण्यात जातो. तो समान वेतनाचा विषय तोंडी लावण्यापुरताच उरतो. त्यामुळे केवळ डोकं बाजूला ठेवून फक्त रजनीस्टाइल करमणूकही उरत नाही आणि धड चांगली कथा म्हणूनही तो पुढे जात नाही. नायिका म्हणून या चित्रपटात राधिका आपटे आणि धन्सिका दोघीही भाग्यवान ठरल्या आहेत. कारण रजनीकांत यांच्या बरोबरीने त्यांना चित्रपटाच्या कथेत स्थान मिळाले असल्याने दोघींना बऱ्यापैकी मोठय़ा लांबीची भूमिका मिळाली आहे. बाकी ‘रजनी’ स्टाइल मलेशियापट म्हणूनच ‘कबाली’ अनुभवावा.
कबाली
दिग्दर्शक – पा. रणजित
कलाकार – रजनीकांत, धन्सिका, राधिका आपटे, विन्स्टन चॅओ, दिनेश रवी, जॉन विजय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabali movie review
First published on: 24-07-2016 at 00:24 IST