आपण काहीही वेडेवाकडे केले नाही तर त्यात भीती ती कसली असा विचार करीतच मी माझ्या दिग्दर्शन पदार्पणातील ‘काकण’ या चित्रपटाच्या कामात गुंतत गेली आहे व त्या नवीन जबाबदारीचा भरपूर आनंददेखील घेत आहे, अभिनेत्री व दिग्दर्शिका क्रांती रेडकर खूप उत्साहात सांगत होती.
‘काकण’ आणि आपल्या इतर चित्रपटांविषयी बोलताना क्रांती म्हणाली, ‘माझे दोन महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून त्यांचे रसिकांकडून कसे स्वागत होते याकडे माझे सगळे लक्ष आहे. पैकी केदार शिंदे दिग्दर्शित ‘खो खो’ खूप धमाल फॅण्टसी चित्रपट आहे. चित्रपटात माझ्या नृत्याला चांगली संधी मिळाली आहे. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव वगैरे बऱ्याच नामवंत कलाकारांचा योग्य व आवश्यक असा भरणा असणारा हा मल्टिस्टारर चित्रपट आहे. त्यापाठोपाठ राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘कुणी घर देता का घर’ हा मजेशीर कौटुंबिक चित्रपट झळकेल. यात पुन्हा एकदा मी भरत जाधवसोबत आहे. मराठी चित्रपट रसिकांना अपेक्षित असणारे स्वच्छ व आशयप्रधान मनोरंजन या चित्रपटांतून मिळेल, असा विश्वास क्रांती रेडकरने व्यक्त केला.  आपल्या ‘काकण’ या दिग्दर्शन पदार्पणाबाबतच्या चित्रपटासंदर्भात क्रांतीला विचारले असता ती म्हणाली, एव्हाना माझी ही प्रेमकथा अध्र्याअधिक प्रमाणात पूर्णदेखील केली आहे. मी स्वत: कोकणातील असल्याने तेथील निसर्गसौंदर्य आपल्या चित्रपटात असावे ही एक इच्छा होती. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रिकरण मी कुडाळमध्ये करते आहे. अन्य दिग्दर्शकांकडे अभिनेत्री म्हणून भूमिका साकारणे व स्वत: दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारताना अन्य कलाकारांना दिग्दर्शित करणे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत याची मला चांगलीच जाणीव होत आहे. ‘काकण’चे दिग्दर्शन मला बरेच काही शिकवत असून एक नवीन क्रांती त्यातून निर्माण होईल असे वाटते, असेही क्रांतीने नमूद केले.  विशेष म्हणजे, क्रांतीच्या दिग्दर्शन पदार्पणातील चित्रपटात तिची स्वत:ची मात्र भूमिका नाही. तशा स्वरूपाची भूमिकाच नसल्याने पडद्यामागे राहिले आहे अशी यावर क्रांतीची प्रतिक्रिया आहे. बऱ्याचदा तरी कोणीही अभिनेता वा अभिनेत्री निर्माता अथवा दिग्दर्शक म्हणून ‘पहिले पाऊल’ टाकताना त्यात स्वत:साठी महत्त्वाची भूमिका घेतो, या वृत्तीला क्रांती चक्क अपवाद ठरलीय.