‘अझर’ : ‘फिक्स्ड’ चित्रपट

अझरुद्दीन या खऱ्या नावानेच चित्रपटाचा नायक (इम्रान हाश्मी) आपल्यासमोर येतो.

एखाद्या वादग्रस्त घटनेवरचा चित्रपट काढायचा तर त्या घटनेचे तटस्थपणे विश्लेषण करणारी बुद्धी हवी. नव्वदच्या दशकात भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवणारा ‘स्टार’ क्रिकेटपटू ते दशक संपता संपता ‘मॅच फििक्सग’ प्रकरणात अडकतो. कधीकाळी चाहत्यांच्या नजरेत असलेला हा हिरो एका रात्रीत इमान विकणारा, देशाला बदनाम करणारा खलनायक ठरतो. या घटनेत चित्रपटासाठी आवश्यक नाटय़ नक्कीच आहे. पण ते तटस्थपणे रंगवण्याऐवजी या चित्रपटाच्या माध्यमातून मोहम्मद अझरुद्दीनला क्लीन चिट देण्यातच निर्माते, दिग्दर्शकाने धन्यता मानली असल्याने हा चित्रपटही ‘अझर’चे फििक्सग आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

‘अझर’ हा चित्रपट म्हणजे मोहम्मद अझरुद्दीन याच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट नाही, असे दिग्दर्शकाने वारंवार सांगितले होते. तसे चित्रपटाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र त्याच्या आयुष्यात घडलेल्या वास्तव घटनेवर प्रेरित होऊन हा चित्रपट केला असल्याचे दिग्दर्शकाचे म्हणणे होते. प्रत्यक्षात अझरुद्दीननेच सांगितलेल्या गोष्टींचा आधार घेऊन हा पूर्ण चित्रपट बेतला असल्याने तो पुरेपूर फसला आहे. चित्रपटाची सुरुवात अझरवरच्या ‘मॅच फििक्सग’ने होते आणि शेवट त्याला या प्रकरणात मिळालेल्या क्लीन चिटने होतो. या दरम्यान, त्याच्या जन्मापासून त्याच्यात भिनलेले क्रिकेट वेड, त्याच्या आजोबांकडून मिळालेले क्रिकेटचे बाळकडू, मुंबईत आल्यानंतर क्रिकेटपटू म्हणून घडत गेलेली कारकीर्द अशा अनेक गोष्टी तोंडी लावण्यापुरत्या येत जातात.

अझरुद्दीन या खऱ्या नावानेच चित्रपटाचा नायक (इम्रान हाश्मी) आपल्यासमोर येतो. त्याच्याबरोबरचे इतर खेळाडू कपिल देव, रवि शास्त्री, नवजोत सिंग सिद्धूू, अजय जडेजा ही मंडळीही त्याच नावाने पडद्यावर दिसतात. अझरची सुरुवात त्याच्या तीन टेस्ट मॅचेसमधील तीन शतकांनी होते इथपासून ते कप्तान म्हणून जबाबदारी घेताना आणि त्यानंतरचे त्याचे सामने हे सगळे त्या त्या तारखांसह, शहरांसह तपशिलासह समोर येतात. तरीही आपण या चित्रपटाला चरित्रपट म्हणायचे नाही, हा दिग्दर्शकाचा आग्रह अनाकलनीय आहे. मात्र त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा चरित्रपट नसल्याने धड अझरची कारकीर्दही यात रंगवता आलेली नाही. आणि मॅच फििक्सग प्रकरण केंद्रस्थानी आहे तर तसेही नाही. तेही प्रकरण तकलादू कोर्ट रूम ड्रामापुरते मर्यादित करण्यात आले असल्याने त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. या चित्रपटातून फक्त मॅच फििक्सगमधून अझरला क्लीन चिट दिलेली नाही तर त्याचा पहिला विवाह मोडण्यासाठी अभिनेत्री संगीता बिजलानी कारणीभूत नव्हती, हे नवे तर्कट मांडत तिच्यावरचाही शिक्का पुसला आहे, नौरीनबरोबरचे (पहिली पत्नी) वैवाहिक संबंध कसे परिस्थितीशरण होते हे सांगत वैयक्तिक नातेसंबंधांतही अझर किती स्वच्छ होता, हेही दाखवण्याचा आटापिटा करण्यात आला आहे.

अभिनयाच्या बाबतीत अझरुद्दीनच्या चालण्यापासून ते स्टेडिअममधील त्याच्या खेळापर्यंत हुबेहूब करण्याचा प्रामाणिक प्रयत्न इम्रान हाश्मीने केला आहे. मात्र फसलेल्या कथेमुळे त्याचा प्रभाव पडत नाही. नौरीनच्या भूमिकेत प्राची देसाईला फारसा वाव नाही. तर संगीताच्या भूमिकेत नíगसची निवड ही फक्त दिसण्याच्या निकषापुरती करण्यात आली असावी, असे वाटते. कपिल देव (वरूण बडोला), नवजोत सिंग सिद्धूू (मनजीत), रवि शास्त्री (गौतम गुलाटी), सुनील गावस्कर (रजित कपूर) ही सगळीच पात्रे खोटी वाटतात. सरकारी वकील म्हणून लारा दत्ता आणि अझरचा वकील या भूमिकेत कुणाल रॉय कपूर आहेत. मुळात, चाहत्यांच्या नजरेतले हरवलेले प्रेम, विश्वास परत मिळवण्यासाठी बनी बनाई कहाणीवरचा हा चित्रपट असल्याची जाणीव पहिल्या फ्रेमपासून प्रेक्षकांच्या मनाची पकड घेते ती शेवटपर्यंत.. त्यामुळे केवळ अझरच्या प्रेमापोटी हा फिक्स्ड चित्रपट पाहण्यालाही काही अर्थ उरत नाही.

अझर

दिग्दर्शक – टोनी डिसूझा

कलाकार – इम्रान हाश्मी, प्राची देसाई, नíगस फाकरी, रजित कपूर, लारा दत्ता, कुणाल रॉय कपूर, कुलभूषण खरबंदा, गौतम गुलाटी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta movie review of azhar

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या