खुल्ला करायचा राडा..राडा म्हणत िहदीत एंट्री घेणाऱ्या दिग्दर्शक रवी जाधव यांचा पहिलाच िहदी चित्रपट बँजो त्यामानाने फॉम्र्युलापटांचा आधार घेऊनच प्रकटला आहे. साध्या-सरळ कथेला कॅमेऱ्यातून कलात्मक रूपडे चढवत सुंदर स्वप्नासारखे सादर करणे हा रवी जाधव यांचा हातखंडा आहे आणि तो बँजोमध्ये पदोपदी जाणवतो. मात्र मराठी चित्रपटांची मांडणी करताना ज्या पद्धतीने वास्तवतेला चढते माप देत व्यावसायिकपणाच्या वेष्टनातून तो लोकांपर्यंत पोहोचवण्यात वाकबगार असलेला हा दिग्दर्शक िहदीत मात्र थोडा कमी पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोटासाठी बँजो वाजवणारा तराट (रितेश देशमुख) आणि त्याची गँग ग्रीझ (धम्रेश येलांडे), पेपर (आदित्य कुमार) आणि वाज्या (राजा मेनन) यांची प्रत्येकाची एक कथा आहे. झोपडपट्टीत राहणारी आणि खाण्याचेही वांदे असणारी ही मंडळी दिवसभर आपापल्या कामात मग्न असतात आणि तिथेही पसा कमी पडला की मग लग्नातून, कार्यक्रमांमधून बँजो वाजवत फिरतात. रस्त्यावरचा बँजो असला तरी जगभरात त्याचे सूर लोकांना वेड लावू शकतील, एवढी ताकद त्या सुरांमध्ये, ते वाजवणाऱ्यांमध्ये आहे हे लक्षात आलेली क्रिस (नíगस फाखरी) त्यांना शोधत न्यूयॉर्कहून मुंबईच्या झोपडपट्टय़ांमध्ये येते. क्रिसचा हा प्रवास सोपा नाही हे दाखवण्यासाठी मग झोपडपट्टय़ांचे बिल्डर्सना हवे तसे संशोधन करणाऱ्या तथाकथित एनजीओचा तुकडाही दाखवण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरलेला नाही. या सगळय़ातून कितीही स्वप्नांमागे धावले तरी वास्तवाचे भान या मंडळींना फार दूर जाऊ देत नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न काही प्रसंगांमधून चांगला उतरला असला तरी तो याआधी आलेल्या अनेक फॉम्र्युलापटांपेक्षा वेगळा वाटत नाही.

बँजो हे वाद्य गेली अनेक वर्षे फक्त पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी वापरले जाते. लग्नसराईतून कधी तरी दिसणारी ही मंडळी गाण्याबजावण्याच्या ध्यासापायी वाजवणाऱ्या अन्य संगीतवेडय़ा कलाकारांसारखीच असतात पण मुळात त्यांची कला ही कलेसाठी नसते. पशासाठी असते आणि मग तोच दोन बँजो वाजवणाऱ्या ग्रुपमध्ये मोलाचा ठरतो. संगीत महोत्सवात स्पर्धा म्हणून वाजवण्यापेक्षा तिथे वाजवल्याचे हातात किती मिळणार हा प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. इथे त्यांच्या मदतीने बँजो बँडबरोबर दोन स्वतंत्र गाणी तयार करून आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात सादर करण्याच्या हेतूने आलेल्या क्रिसची कसोटी लागते. मुळात या दोन प्रचंड वेगवेगळ्या स्तरांवर जन्मलेल्या आणि वाढलेल्यांच्या विचारसरणीतली तफावत आणि मग त्यांचं एकत्र येणं हा भाग चित्रपटात खूप चांगल्या पद्धतीने येतो. वरळी कोळीवाडय़ाचा सुंदर समुद्र आणि तरीही आजूबाजूला घाणीच्या साथीने वाढलेली झोपडपट्टी आणि तिथली मानसिकता दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांनी अचूक पकडली आहे. रंगीबेरंगी, नाजूक, मलमली कपडय़ांनी सजलेल्या क्रिसबरोबर स्वप्नात नाचगाणे करतानाही तराटला ती रस्ते झाडतानाच दिसते. छोटय़ा छोटय़ा गोष्टीतील कलात्मक मांडणी, मग ते गणपतीतले गाणे आणि त्यावर नाचणारा तराट किंवा उडन छू गाणे असेल कॅमेरामन मनोज लोबो यांनी अर्धी कामगिरी फत्ते केली आहे.

पण बँजो नावात आहे त्यामुळे गाण्यात त्याचा सूर हरवत नसला तरी कथेत तो हरवला आहे. पूर्वार्धात लागोपाठ वाजणाऱ्या तीन गाण्यांचा बँजो वादक म्हणून तराटच्या कथेशी काही संबंध नाही. जिथे खऱ्या अर्थाने बँजो बँड म्हणून त्यांची वाटचाल सुरू होते तेव्हाची गाणी जास्त महत्त्वाची ठरतात. मात्र तिथे दोनच गाणी ऐकायला मिळतात. त्यातले राडा हे एकमेव गाणे परिणामकारक वाटते. त्यामुळे खरोखरच रस्त्यावरच्या संगीताला आंतरराष्ट्रीय संगीत म्हणून लौकिक मिळवायचा झाला तर त्यासाठीचा संघर्ष, त्यानिमित्ताने उभ्या राहणाऱ्या अनेक भौतिक, मानसिक समस्या अशा मोठय़ा विषयाला दिग्दर्शकाने हातच लावलेला नाही. त्याउलट, स्थानिक नेते, बिल्डर, तराटचा भूतकाळ अशा गोष्टींमध्ये चित्रपट फसतो. रितेश देशमुख आपल्या नेहमीच्या साचेबद्ध भूमिकांमधून बाहेर पडला आहे. तराटच्या भूमिकेतून तो रॉकस्टारसारखा समोर येतो, हाणामारीही करतो मात्र त्याची त्याच्या मित्रांबरोबरची केमिस्ट्री तितक्या घट्टपणे समोर येत नाही जेवढी ती प्रेक्षकांनी त्याच पद्धतीच्या दगडूमध्ये अनुभवली होती. मििलद िशदे छोटय़ाशा भूमिकेतही भाव खाऊन जातात. नíगस फाखरीच्या अभिनयाबद्दल फारसे काही बोलण्यासारखे नाही. शिवाय, तराट आणि क्रिसमधले नाते स्वप्निल आहे, ते वास्तवात येणारे नाही हेही निश्चित असल्याने त्यांच्यातला रोमान्सही दिसत नाही. कथेवर जास्त भर दिला असता तर बँजोचे सूर अधिक परिणामकारक ठरले असते.

बँजो

निर्माता इरॉस इंटरनॅशनल

दिग्दर्शक रवी जाधव

कलाकार रितेश देशमुख, नíगस फाखरी, मििलद िशदे, धम्रेश येलांडे, आदित्य कुमार, राजा मेनन, लीलाधर कांबळी.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta movie review on benjo movie
First published on: 25-09-2016 at 02:27 IST