scorecardresearch

‘प्रवाहाबरोबर पोहायला आवडलं’

१२५ हिंदी चित्रपट, ९५ मालिका, २६ नाटकं आणि ४५ जाहिरातींमधून त्यांनी काम केलं आहे. इतकी मोठी अभिनयाची कारकीर्द, ‘इंडियन ऑइल’सारख्या कंपनीत प्रतिष्ठित पदावर काम, सैन्यात मेजरपदापर्यंत झालेली वाटचाल.

रेश्मा राईकवार

पुलंच्या सहवासातील दोन आठवडे..

१२५ हिंदी चित्रपट, ९५ मालिका, २६ नाटकं आणि ४५ जाहिरातींमधून त्यांनी काम केलं आहे. इतकी मोठी अभिनयाची कारकीर्द, ‘इंडियन ऑइल’सारख्या कंपनीत प्रतिष्ठित पदावर काम, सैन्यात मेजरपदापर्यंत झालेली वाटचाल.. इतके बहुरंगी, बहुआयामी आयुष्य ते जगले आहेत. आयुष्यात सगळय़ात लक्षात राहिलेला काळ कोणता, असं त्यांना विचारलं तर ते एकच सांगतात, ‘पुलंबरोबर घालवलेले दोन आठवडे मी कधीच विसरू शकणार नाही’. अच्युत पोतदार हे इंदौरचे. त्याकाळी इंदौरमध्ये दोन दिवसांच्या कामानिमित्त आलेले पु. ल. देशपांडे त्यांच्या घरी उतरले होते. ‘ते आले दोन दिवसांसाठी, मात्र दोन आठवडे ते तिथे राहिले. सकाळी पाचला पुलं उठायचे आणि रात्री अकराला झोपायचे. त्यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण हा काही ना काही देऊन जाणारा असायचा. सरस्वती त्यांच्या जिभेवर नाचायची. अत्यंत साधा माणूस. खरं तर पुलंना मांसाहारी पदार्थ खूप आवडायचे, मात्र इंदौरमधील आमच्या घरी दोन आठवडे त्यांना साधंच शाकाहारी जेवण मिळालं. त्यांनी कधीच कसली तक्रार केली नाही. ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटक त्यांनी त्या दोन आठवडय़ांच्या काळात आमच्या घरी लिहून पूर्ण केलं. ते क्षण मला आजही तसेच्या तसे आठवतात’, असं पोतदार सांगतात.

माझ्या वेळेनुसारच..

हिंदी चित्रपटसृष्टीतील आजचे आघाडीचे म्हणवले जाणारे गोविंदा, अक्षय कुमार, अजय देवगण ही मंडळी त्यावेळी तरुण कलाकार म्हणून नावारूपाला येत होती. त्याकाळी गोविंदासारख्या कलाकारांचं सेटवर उशिरा येणं वगैरे रोजच्या घटना होत्या, पण या कलाकारांच्या अशा नखऱ्याचा आपल्याला कधीच फटका बसला नाही, असं पोतदार सांगतात. चित्रपटाचा हिरो किती उशिरा – लवकर येतो, याच्याशी माझं देणंघेणं नाही. त्याच्याबरोबर माझा शॉट असेल तेव्हाच मला बोलवा, असं मी स्पष्ट सांगून ठेवायचो. त्यामुळे मला कधीही वाट पाहावी लागली नाही. अक्षय, अजयसारखी मंडळी मला कायम आदर देत आली आहेत. एरव्ही पटकथेकडे ढुंकूनही न बघणारे अक्षयसारखे कलाकार माझ्याबरोबर एखादं दृश्य आहे हे कळलं तरी आधी पटकथा वाचून तयारी करायचे. या सगळय़ांनी त्या काळात खूप मेहनत घेतली आहे. अजयकडे तर हिरोसारखा देखणा चेहराही नव्हता, पण सेटवरच इतर कलाकारांचा अभिनय बघत, शिकून घेत त्यांनी स्वत:ला घडवलं आहे आणि म्हणून आज ते टिकून आहेत, असं ते म्हणतात.

कधी कधी एकच संवाद, तर कधी नुसताच फ्रेममधला वावर.. मात्र तोही दखल घ्यायला लावणारा.. असे काही चेहरे चरित्र कलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीने अनुभवले आहेत. प्रसिध्दीपासून दूर असलेले हे कलाकार जेव्हा जेव्हा जाहिरात किंवा चित्रपटातल्या अवघ्या काही सेकंदाच्या दृश्यातून समोर येतात, तेव्हा अरे हे किती दिवसांनी दिसले.. अशा शब्दांत त्यांच्या भेटीचा आनंद आपल्या तोंडून बाहेर पडतो. हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून दखल घ्यायला लावलेला असा एक मराठमोळा चेहरा म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार. नव्वदीच्या जवळ पोहोचलेले ‘माझा होशील ना’ मालिकेतून घरोघरी लाडके झालेले ‘आप्पा’ म्हणजेच अच्युत पोतदार यांना आजही रंगभूमी ते अगदी काल-परवा प्रसिध्द झालेल्या त्यांच्या आयपीएलच्या जाहिरातीपर्यंत सगळय़ा गोष्टी खडा न् खडा आठवतात. आवडीने अभिनय केला, त्यामागे पैशाचा-प्रसिध्दीचा मोह नव्हता, त्यामुळे ‘समाधानी’ आहे, अशा शब्दांत आपल्या आयुष्याचा आनंद ते इतरांबरोबर वाटतात.

१९९२ साली आलेल्या ‘अंगार’ चित्रपटात त्यांनी अभिनेता जॅकी श्रॉफ याचा बाप रंगवला होता. चाळीतला अन्यायाविरुध्द लढण्यासाठी तयार असलेला तापट डोक्याचा बेरोजगार जग्गू आणि त्याच्या करामतींमुळे वैतागलेला त्याचा बाप, मुलाला त्याच खमक्या आवाजात चार शब्द सुनावणारा, तो काहीच बोलत नाही म्हटल्यावर कोपऱ्यातील चपला पायात सरकवत निघून जाणाऱ्या बापाचा चेहरा आजही कलाकारांना आठवतो. ‘थ्री इडियट्स’मध्ये मशीनची व्याख्या सांगणाऱ्या आमिर खानला ‘केहना क्या चाहते हो..’ म्हणणारा प्राध्यापक.. अशा कितीतरी प्रसंगात अच्युत पोतदार यांचा चेहरा, त्यांचा अभिनय आठवत राहतो. अभिनय ही त्यांच्या आयुष्यात योगायोगाने घडलेली गोष्ट. ‘मी अकरा वर्षांचा होतो, तेव्हा वडील वारले. तेव्हा माझ्या हातात काहीच नव्हतं. अभ्यास करून नोकरी मिळवणं हेच उद्दिष्ट होतं. मात्र त्याही काळात कधी कधी अभ्यासाचा बोऱ्या वाजायचाच, त्याचा कधी खेद वाटला नाही’, असं ते सांगतात.

अभिनय मी कधीच पैशासाठी केला नाही. सुरुवातीला मला कधी कधी पैसेही दिले जायचे नाहीत. तेव्हा ओम पुरीसारखा माझा मित्र मला कायम ओरडायचा. आपल्या कामाचे मोजून पैसे घेतले पाहिजेत, असं तो दटावायचा. ‘अंगार’, ‘रंगीला’, ‘परिणीता’, ‘थ्री इडियट्स’ खूप चांगल्या चित्रपटांचा मला भाग होता आलं. तुम्हाला तुमची भूमिका जेव्हा आवडते, तेव्हा तुमचं सादरीकरण उत्तम होतं. शेवटी कलाकाराने जीव ओतल्याशिवाय भूमिका चांगली होत नाही, असं ते म्हणतात. अपयशाचे धक्केही पचवावे लागले. निहलानींच्या ‘तमस’ मालिकेत काम करायची खूप इच्छा होती, मात्र मराठी उच्चाराचा प्रभाव जास्त असेल या कारणाने त्यात भूमिका दिली गेली नव्हती. विधू विनोद चोप्रांच्या प्रत्येक चित्रपटात मी काम केलं, मात्र त्याच्या ‘एकलव्य’ या एकमेव चित्रपटात खूप इच्छा असूनही मला भूमिका मिळाली नाही. ती भूमिका परिक्षित साहनी यांनी केली. अशाही गोष्टी घडल्या, पण प्रवाहाबरोबर पोहायला आवडलं. जे रुचलं ते मनापासून केलं. बदल ही एकच गोष्ट प्रगतीकडे नेणारी असते. त्यामुळे जसा प्रवाह बदलला तसा मीही बदललो. तुम्हाला प्रवाहाबरोबर पोहता आलं पाहिजे. परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल घडवत पुढे जाता आलं पाहिजे, असा सल्ला ते देतात.

हिंदीत काम केल्यामुळे मी हिंदीच आहे, असा समज झाला असेल बहुधा.. त्यामुळे मला मराठीत कोणी फारशा भूमिका दिल्या नाहीत, अशी खंत ते व्यक्त करतात. पण मुळातच अभिनय केला तो आवड होती म्हणून.. पैसा किंवा प्रसिध्दी किंवा अमुक एक भूमिकाच हवी, असा अट्टहास केला नाही. त्यामुळे खूप समाधानी आहे, असं ते सांगतात. याही वयात त्यांनी आजवर केलेल्या भूमिका, काही समाजोपयोगी कामे यांची तपशीलवार, सुरेख अक्षरात नोंदी केलेल्या वह्या त्यांनी जपल्या आहेत. आता माझा हात थरथरतो, त्यामुळे लिहिता येत नाही असं सांगणाऱ्या अच्युत पोतदार यांनी समाजाचं देणं आपल्या पध्दतीने देत राहण्याचेही जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या आयुष्यात आलेले साहित्यिक, कलावंत, काही जिवलग यांच्या नावाने देशभरातील प्रत्येक ठिकाणी काही ना काही पध्दतीचं सामाजिक कार्य त्यांनी उभं केलं आहे. याची नोंद असणाऱ्या त्यांच्या डायरीचं नावही त्यांनी ‘समाधान’ असंच दिलं आहे. लोकांकडून मिळालेलं प्रेम, थोरामोठय़ांचा सहवास, सैन्यदलात देशासाठी केलेली सेवा, ‘इंडियन आइल’मधील कार्यकाळ आणि नाटक-चित्रपट-मालिका-जाहिरात अशा हरएक माध्यमातून केलेलं काम हे सगळंच आनंददायी आणि समाधान देणारं होतं, अशा कृतज्ञ भावनेने वावरणारा कलाकार विरळा. अच्युत पोतदार यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार हे एकंदरीतच चित्रपट-मालिका विश्वाच्या वाटचालीतील इतिहासाचे साक्षीदार आहेत. एक पर्व त्यांनी अनुभवलं, घडवलं. तरीही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. वयाच्या ८८ व्या वर्षीही कंगना राणावतच्या चित्रपटाविषयी विचारणा झाली आहे हे उत्साहाने सांगणारे, भूमिका करण्यासाठी आसुसलेले, अच्युत पोतदार यांच्यासारखे प्रतिभावंत, सच्चे कलाकार आपल्याला लाभले आहेत ही आपल्यालाही समाधान देऊन जाणारी लाखमोलाची गोष्ट.

जे रुचलं ते मनापासून केलं. प्रवाहाबरोबर पोहायला आवडलं.  बदल ही एकच गोष्ट प्रगतीकडे नेणारी असते. त्यामुळे जसा प्रवाह बदलला तसा मीही बदललो. तुम्हाला प्रवाहाबरोबर पोहता आलं पाहिजे. परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल घडवत पुढे जाता आलं पाहिजे.  मुळातच अभिनय केला तो आवड होती म्हणून.. पैसा किंवा प्रसिध्दी किंवा अमुक एक भूमिकाच हवी, असा अट्टहास केला नाही. त्यामुळे खूप समाधानी आहे.

-अच्युत पोतदार

दुबे आणि अभिनयाचा श्रीगणेशा..

अभिनयात रस हा माझे मेहुणे प्रभाकर किबे यांच्यामुळे निर्माण झाला, असं ते सांगतात. प्रभाकर किबे हे इंदौरमधील नामी नकलाकार, संगीतकार होते. त्यांच्या सहवासात राहिल्याने एकूणच गाणं, नाटक सगळय़ाबद्दल रस निर्माण झाला. पुढे सैन्यात असताना अनेकांना माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे मी चित्रपट-नाटकात काम करतो, असं वाटायचं. मला आवड होतीच, अखेर तिथेही नाटकात काम करण्याची संधी मिळाली. वयाच्या ४४ व्या वर्षी खऱ्या अर्थाने माझा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला, असं ते सांगतात. अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचा भाऊ इंडियन ऑइलमध्ये कामाला होता. त्याने मला एकदा विचारणा केली आणि पंडित सत्यदेव दुबेंकडे घेऊन गेला. दुबेंनी पहिल्याच दिवशी माझी निवड केली. त्यांच्याकडे मी मनापासून शिकलो, त्यांना गुरू मानून सगळं काही करत होतो. अगदी रोजच्या रोज माहीमहून वांद्रयाला सकाळी येऊन मी त्यांची खोली साफ करून ठेवायचो. दुबेंकडे आम्ही तीन ‘एपी’ प्रसिध्द होतो. अमरीश पुरी, ओम पुरी आणि मी.. त्याच काळात मी विजयाबाई मेहतांबरोबर ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक केलं आणि मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. राम नगरकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘रामनगरी’ हा चित्रपट अभिनेते – दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी केला. तो माझा पहिला चित्रपट. या चित्रपटाची निर्मितीही पालेकरांनीच केली होती.  त्यानंतर रंगभूमीवरचं माझं काम पाहून सईद मिर्झानी मला चित्रपटातील भूमिकांसाठी विचारणा केली. मग विधू विनोद चोप्रासारखा निर्माता, गोविंद निहलानी, श्याम बेनेगल, राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटांमध्ये मी काम केलं. गोविंद निहलानींबरोबर खूप चित्रपट केले आहेत, अशी आठवणही त्यांनी सांगितली. अर्थात अभिनयाची ही सगळी घोडदौड ‘इंडियन ऑइल’मधील त्यांची नोकरी सांभाळूनच ते करत होते. सुरुवातीला ‘इंडियन ऑइल’मध्ये काम करणाऱ्यांना अशाप्रकारे इतरत्र काम करण्याची परवानगी नव्हती, असं मला सांगण्यात आलं होतं. कंपनीचं धोरणच होतं तसं.. पण तत्कालीन व्यवस्थापकांना भेटलो आणि माझ्या अभिनयाच्या आवडीबद्दल सांगितलं. मला परवानगी मिळाली, पण मी कधीही सुट्टी घेऊन चित्रीकरण केलं नाही. उलट, आमच्याकडे पाच दिवसांचा आठवडा होता. त्यामुळे उरलेले दोन दिवस पूर्ण माझे असायचे. या दोन दिवसांत मी माझं चित्रीकरणाचं नियोजन करायचो. मुळात माझ्या भूमिका फार लांबलचक नसल्याने दोन दिवसांत चित्रीकरण करणं शक्य होतं, अशी आठवण त्यांनी सांगितली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Love hindi movies series plays advertisements career prestigious post ysh