गुंतवणूकदारांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या एका कंपनीवर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकून सहा जणांना अटक केली. अनेक पटीने परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांकडून कंपनीने पैसे उकळल्याचा आरोप आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये ‘मद्रास कॅफे’ चित्रपटातील अभिनेत्री लीना पॉलसह गीतकार हसरत जयपुरी यांच्या मुलाचाही समावेश आहे. या दोघांच्या घरातून पोलिसांनी आलिशान घडय़ाळ, मोबाइल, गाडय़ा आदी कोटय़वधी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
गोरेगाव येथे ‘लायन ओक इंडिया’ नावाची कंपनी गुंतवणूकदारांना अनेक पटीने परतावा देण्याचे आश्वासन देत असल्याची माहिती मिळाली. ही कंपनी बोगस असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी छापा टाकून कंपनीचा संचालक शेखर चंद्रशेखर (२८) त्याची मैत्रीण आणि लीना पॉल (२५) यांना अटक केल्याची माहिती सहपोलीस आयुक्त धनंजय कमलाकर यांनी दिली.
आरोपींच्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. त्यांनी एकूण २३ गुंतवणूक योजनेमार्फत गुंतवणूकदारांकडून पैसे गुंतवले होते. त्यांना अनेक पटींनी परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. अगदी पाच हजारांपासून ३० लाखांपर्यंतची रक्कम तब्बल एक हजार गुंतवणूकदारांनी केल्याची कागदपत्रे पोलिसांना आढळली आहेत. त्यानंतर पोलिसांनी हसरत जयपुरी यांचा मुलगा अख्तर जयपुरी यांच्यासह, अदिल जयपुरी, नासीन जयपुरी, सलमान रिझवी यांना अटक केली. जयपुरी यांच्या घरात घातलेल्या छाप्यात गुंतवणीसंदर्भातली कागदपत्रे सापडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आरोपींना ४ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
चंद्रशेखर आणि लीना पॉल यांच्या घरी घातलेल्या छाप्यात ५ कोटी रुपयांच्या नऊ महागडय़ा गाडय़ा, ३७ लाखांचे मोबाइल फोन, सव्वा कोटी रुपयांची महागडे परदेशी घडय़ाळे आढळून आली आहेत. त्यांच्या घराचे मासिक भाडे ७५ हजार रुपये होते. चंद्रशेखरकडे बसण्यासाठी सिंहासन होते. तो बंदूक आणि अंगरक्षकही बाळगून होता, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madras cafe actress leena paul arrested in a fraud case
First published on: 03-06-2015 at 01:01 IST