इलु इलु’ म्हणत ३० वर्षांपूर्वी रसिकांच्या मनात स्थिरावलेली मनिषा कोईराला आता कर्करोगातून सावरली आहे. आपल्या तब्बेतीबाबत तिने आपल्या चाहत्यांना ट्विटरवरून माहिती देत त्यांच्या मनावरचा ताण कमी केला आहे. गेले वर्षभर रुग्णालय, सुया, सलाइन वगैरे वातावरणात वावरलेल्या मनिषाच्या आयुष्याची गाडी आता पूर्ववत होत आहे.
गेल्या वर्षी मनिषाला कर्करोग झाल्याचे जाहीर होताच तिच्या चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतही काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मनिषाने तातडीने न्युयॉर्कला धाव घेत इलाज सुरू केला. या उपचाराला फळ आले आणि गेल्याच महिन्यात मनिषाचा कर्करोग बरा झाल्याची बातमी आली. मात्र गेल्या वर्षभराच्या उपचारातून सावरण्यासाठी मनिषा अजून झगडत आहे. पण आता आपले आयुष्य पूर्ववत होत चालले आहे, असे तिने स्वत:च सांगितले आहे.
मनिषाने चालत चालत न्यूयॉर्कमधील स्ट्रीट फेअर या रस्त्यावर फेरफटका मारत खरेदीचा आनंद लुटला. या वेळी तिने मक्याचे कणीस, लिंबू सरबत वगैरेचाही आस्वाद घेतला. तब्बल एक वर्ष आपण या सर्वच गोष्टीला मुकलो होतो. रस्त्यावर उतरून घासाघीस करत खरेदी करण्याचा आनंद अवर्णनीय आहे, असे तिने ट्विटरवर लिहिले. मनिषा फक्त खरेदी करून थांबली नाही, तर तिने नव्याने प्रदर्शित झालेला ‘द ग्रेट गॅट्सबी’ हा चित्रपट पाहण्यासाठीही वेळ काढला. या चित्रपटाबाबत आपले खास मतही तिने व्यक्त केले आहे.