scorecardresearch

Premium

अभिनयातील मधुरव

लोकसत्ता’शी संवाद साधणाऱ्या मधुराने सगळया माध्यमांमध्ये चित्रपट आणि नाटकाकडे आपला ओढा अधिक असल्याचे सांगितले.

actress madhura velankar in conversation with loksatta
अभिनेत्री मधुरा वेलणकर

नाटक, सिनेमा, मालिका अशा तिन्ही क्षेत्रांत वेगवेगळया भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुरा वेलणकर तिच्या स्वभावामुळे तसेच कुशल अभिनय शैलीमुळे नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकून घेते. २००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘गोजिरी’ या तिच्या चित्रपटाचे आजही कौतुक केले जाते. सोनी मराठी वाहिनीवरील ‘तुमची मुलगी काय करते’  या मालिकेतील तिची मध्यवर्ती भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि यावर्षी जूनमध्ये प्रदर्शित झालेला ‘बटरफ्लाय’ हा तिची निर्मिती – मध्यवर्ती भूमिका असलेला चित्रपट अजूनही चर्चेत आहे. यंदाच्या इफ्फी महोत्सवातही या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. सातत्याने नवे काही करण्यासाठी धडपडणाऱ्या मधुराचे नवीन नाटकही आजपासून रंगभूमीवर दाखल होत आहे.  कलाकार म्हणून विविध आघाडयांवर सक्रिय असताना येणाऱ्या अनुभवांविषयी ‘लोकसत्ता’शी संवाद साधणाऱ्या मधुराने सगळया माध्यमांमध्ये चित्रपट आणि नाटकाकडे आपला ओढा अधिक असल्याचे सांगितले.

‘आपण यांना पाहिलंत का?’ या प्रसिद्ध नाटय दिग्दर्शक विजय केंकरे यांचे दिग्दर्शन असलेल्या नवीन नाटकाचा शुभारंभ रविवार, १० डिसेंबरपासून होत आहे. या नाटकात मी तुषार दळवी, विक्रम गायकवाड आणि श्रुती पाटील या कलाकारांबरोबर काम करते आहे, असे मधुराने सांगितले. सध्या अनेक मराठी कलाकार चित्रपट, मालिका, ओटीटी माध्यमांमध्ये व्यग्र असल्याने रंगभूमीपासून दूर असतात. या नाटकाच्या निमित्ताने मधुरा आणि तुषार दळवी पुन्हा एकत्र काम करणार आहेत. त्याबद्दल बोलताना ती म्हणते, ‘तुषार आणि मी फार पूर्वीपासून एकत्र काम केले आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या कामाबद्दल पूर्ण माहिती आहे. नाटक चांगले वठवायचे असेल तर त्याला वेळ द्यावाच लागतो. आणि रंगभूमीवर काम केलेल्या कलाकाराला नाटकासाठी किती वेळ द्यावा लागतो याची कल्पना असते. तुषारसुद्धा रंगभूमीवरचा कलाकार असल्याने त्याला वेळेबद्दल पुरेशी जाण आहे, तो अनुभवी कलाकार आहे, त्यामुळे या नाटकाचे भरपूर प्रयोग होतील अशी माझी खात्री आहे. श्रुती पाटील आणि विक्रम गायकवाड या दोघांबरोबरही मी पहिल्यांदाच काम करते आहे. तरीही त्यांचा नाटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला खूप आवडला आणि तालीम करता करता त्यांच्यासोबत एक छान नातेही तयार झाले आहे’.

Song from the movie Jaga Char Diwas produced by Jagruti Entertainment news
‘जगा चार दिवस’ चित्रपटाचा गीत ध्वनिमुद्रणाने मुहूर्त..
Aata Vel Zaali movie pramotion
इच्छामरणाचा अधिकार मागणाऱ्या जोडप्याची गोष्ट
viju-mane-marathi-industry
मराठी चित्रपट का चालत नाही? विजू मानेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले, “बऱ्याच मंडळींना वाटतं की…”
warhol by author blake
बाजारकेंद्री, तरीही क्रांतिकारी कला…

हेही वाचा >>> नाटयरंग : ‘मर्डरवाले कुलकर्णी’ – मॅडच्यॅप फार्सिकल कॉमेडी

मालिका आणि चित्रपट दोन्हीकडे विविध भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आलेल्या मधुराने ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नाटकातील भूमिकेची निवड कोणत्या विचाराने केली? याबद्दल बोलताना या नाटकाची विनोदी हलकीफुलकी मांडणी असल्याने तशा भूमिकेची आपल्याला गरज होती, असे तिने सांगितले. ‘समाजात अशा अनेक गोष्टी घडत असतात, ज्याबद्दल कधीच कोणी बोलत नाही’ इतक्या माफक शब्दांत नाटकाची माहिती देत त्याच्या कथेविषयी अधिक तपशील देणे मधुराने टाळले. ‘या नाटकात महत्त्वाचा विषय रंजक आणि विनोदी शैलीतून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सुशील सामी हे नाटककार आहेत, तसेच विजय केंकरे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. गेले तीन-चार वर्ष मी सातत्याने गंभीर भूमिका करते आहे, त्यामुळे विजय केंकरे यांनी या नाटकाबद्दल मला सांगितले तेव्हा मी लगेच होकार दिला’ असे मधुराने सांगितले. जोरदार तालमींनंतर नाटकाचा पहिला प्रयोग रंगणार असल्याने प्रचंड उत्सुकता असल्याचेही तिने सांगितले.

मधुराने ‘बटरफ्लाय’ चित्रपटात मेघा नावाची व्यक्तिरेखा केली आहे आणि योगायोग म्हणजे या नाटकातही तिच्या पात्राचे नाव मेघा आहे. मात्र या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये कमालीचे अंतर आहे, असे तिने सांगितले. या नाटकातली मेघा ४५ वर्षांची आहे, इंटेरिअर डिझायनर आहे. तिची दोन मोठी मुलं आहेत. तर ‘बटरफ्लाय’ चित्रपटातली मेघा ही पस्तिशीतली गृहिणी होती. गावातून लग्नानंतर शहरात आलेल्या मेघाला अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात, पण त्यात अडचणी येतात आणि मेघा हाती घेतलेली गोष्ट अर्धवट सोडून देते, अशी काहीशी तिची स्वभावछटा चित्रपटात होती. नाटकातली मेघा मात्र विचारांनी पुढारलेली आहे, पण अचानक तिच्या आयुष्यात एक गडबड होते त्यावेळी ती काय करते हे या नाटकातून दाखवण्यात आले आहे, अशी माहिती मधुराने दिली.

कलाकार म्हणून नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांत काम करायला मला आवडते.  मात्र मालिकेपेक्षा नाटक आणि चित्रपट या दोन माध्यमांकडे माझा कल जास्त आहे.  नाटक ही जिवंत कला आहे. रंगमंचावर सगळे प्रत्यक्षात घडत असते. तिथे आपल्याला सहकलाकारांसोबत जुळवून घ्यावे लागते. काही प्रसंगी वेळ मारून न्यावी लागते. तर चित्रपट करताना कथेनुरूप एकसलग चित्रीकरण होत नाही. तुमची वेगवेगळी दृश्ये चित्रित होत असतात, अशावेळी कलाकार म्हणून ते निभावून नेणे हे कसब असते. शिवाय, चित्रपटात काम करताना कॅमेरा एवढा जवळ असतो की फक्त थोडी हालचाल झाली तरी ते कळून येते, त्यामुळे तांत्रिक गोष्टी समजून काम करणेही फार महत्त्वाचे ठरते. तेच नाटकाच्या बाबतीत शेवटच्या रांगेपर्यंत आवाज जाईल, अशापद्धतीने खणखणीत आवाजात सहज अभिनय करणे हेही आव्हानात्मक असते.  नेहमीच्या सरावाच्या गोष्टींपेक्षा वेगळे काहीतरी करून पाहण्याची आवड कलाकारांना असते. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना वेगळे काय देता येईल या ध्यासातूनच मालिका, चित्रपट वा नाटकातील भूमिकांची निवड केली जाते. वेगळे करून पाहण्याची गंमत अनुभवता येणार असेल तर माध्यम कुठलेही असले तरी फरक पडत नाही.  मधुरा वेलणकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress madhura velankar in conversation with loksatta zws

First published on: 10-12-2023 at 04:48 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×