दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’ जोरदार सुरू आहे. १४ मेपासून सुरू झालेला ‘कान फेस्टिव्हल’ २५ मे पर्यंत असणार आहे. अनेक दिग्गज कलाकार मंडळी कानच्या रेड कार्पेटवर पाहायला मिळाले. बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, कियारा अडवाणी अशा बऱ्याच अभिनेत्रींनी कानच्या रेड कार्पेटवर जलावा दाखवला. बहुचर्चित अशा ‘कान फेस्टिव्हल’ला प्रसिद्ध मराठी अभिनेत्री छाया कदम यांनी हजेरी लावली. मराठमोळ्या लूकमध्ये छाया कदम उपस्थित राहिल्या होत्या. याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. ‘कान फेस्टिव्हल निमित्ता’ने छाया कदम यांची भेट सुप्रसिद्ध संगीतकार, गायक ए.आर. रेहमान यांच्याशी झाली. यासंदर्भात त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

काल, छाया कदम आईची साडी, नथ, केसात गजरा, कपाळावर टिकली असा मराठमोळा लूक करून ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला पोहोचल्या होत्या. त्यांनी या सुंदर लूकमधील फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली होती. “आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले…पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून ‘कान फिल्म फेस्टिव्हलपर्यंत घेऊन आले, याचे समाधान आहे. तरी आई आज तू हवी होतीस. हे सगळं पाहण्यासाठी. लव्ह यू मम्मुडी आणि खूप खूप मिस यू,” असं छाया यांनी लिहिलं होतं. अभिनेत्रीच्या या पोस्टसह लूक खूप चर्चेत आला होता. त्यानंतर आज छाया कदम यांनी ए.आर. रेहमान यांच्या भेटीसंदर्भात पोस्ट केली आहे.

हेही वाचा – Video: मतदान करायला गेलेल्या रणबीर कपूरच्या ‘त्या’ कृतीने चाहत्यांची जिंकली मनं, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री छाया कदम यांनी ए.आर. रेहमान यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “‘कान फिल्म फेस्टिव्हल’च्या निमित्ताने ही भेट होणं आणि निवांत अर्धा तास गप्पा मारत फ्रान्सच्या रस्त्यांवर फिरत फिरत शेवटी एक सेल्फी होणं म्हणजे, ‘इन बहारों में दिल की कली खिल गई…मुझको तुम जो मिले, हर ख़ुशी मिल गई'”

छाया कदम यांची ही पोस्ट पाहून अनेक कलाकारांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. अभिनेत्री नंदिना पाटकरने “आईच्या गावात” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर प्रियदर्शनी इंदलकरने “आई शप्पथ, अगं ताई…” असं लिहिलं आहे. तसंच “क्या बात” अशी प्रतिक्रिया अश्विनी कासारने दिली आहे. याशिवाय नम्रता संभेराव, समीर चौघुले, ऋतुजा बागवे, सुयश टिळक, अभिषेक रहाळकर अशा बऱ्याच कलाकारांनी छाया कदम यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – “जवानीमध्ये असे नखरे दाखवायला पाहिजे होतेस,” म्हणणाऱ्यावर ऐश्वर्या नारकर संतापल्या, म्हणाल्या, “भाऊ…”

दरम्यान, छाया कदम यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्यांच्या दोन हिंदी चित्रपटांचा खूप बोलबोला आहे. किरण राव दिग्दर्शित ‘लापजा लेडिज’ चित्रपटात छाया यांनी मंजू माईची भूमिका साकारली आहे. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. छाया यांचे चित्रपटातील बरेच डायलॉगचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. याशिवाय कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगांव एक्सप्रेस’ चित्रपटात छाया कदम झळकल्या आहेत. या चित्रपटातील देखील त्यांच्या कामाचं कौतुक होतं आहे.