दिग्दर्शक, निर्माते सचिन पिळगांवकर यांनी ५ फेब्रुवारीला ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत सचिन यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. १९ वर्षांनंतर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग येत असल्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा त्या बसमधला प्रवास पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. अशातच ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी पहिल्या चित्रपटातील बसवर सचिन पिळगांवकर यांनी किती खर्च केला होता? याचा खुलासा केला आहे.

२००४साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिव्हर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर असे अनेक तगडे कलाकार पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील गाणी, डायलॉग सुपरहिट झाले होते. अजूनही आवडीने हा चित्रपट पाहिला जातो.

हेही वाचा – Video: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील नेत्रा व रुपालीने दिल्या अनोख्या अंदाजात होळीच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

‘नवरा माझा नवसाचा’ या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगांवकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेते जयवंत वाडकर यांनी ‘महाएमटीबी’च्या पॉडकास्टमध्ये ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा त्यांनी बसवर झालेला खर्च देखील सांगितला. ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ती बस खरी तर होतीच. पण त्यावर सचिन यांनी ७० ते ७५ हजार रुपये खर्च केले होते, असं जयवंत वाडकर यांनी सांगितलं. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळली होती.

हेही वाचा – बॉक्स ऑफिसवर ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटापेक्षा ‘मडगांव एक्सप्रेस’ सुपरफास्ट, दोन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात कोणते कलाकार झळकणार?

‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी सचिन पिळगांवकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती.