केदार शिंदे यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘यंदा कर्तव्य आहे’. २००६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. अ‍ॅरेज मॅरेज झाल्यानंतर नवविवाहित दाम्पत्याला येणाऱ्या अडचणी आणि मग त्यातून फुलणार प्रेम या चित्रपटात पाहायला मिळत. अंकुश चौधरी व स्मिता शेवाळे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपट आजही तितक्याच आवडीने पाहिला जातो. विशेष म्हणजे या चित्रपटातील ‘आभास हा’ गाणं. या गाण्याने मराठी रसिकांना अक्षरशः वेड लावलं. आज ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपटाला १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने या चित्रपटातील स्वाती म्हणजे अभिनेत्री स्मिता शेवाळे सध्या काय करते? जाणून घेऊयात.

अभिनेत्री स्मिता शेवाळेनं ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. वयाच्या १९व्या वर्षी स्मिताने केदार शिंदेंचा हा चित्रपट केला. या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपटापासून स्मिता मराठी सिनेसृष्टीत अविरत काम करत आहे. वेगवेगळ्या चित्रपट, मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारताना स्मिता दिसत आहे.

हेही वाचा – Video: “आपल्या आई-वडिलांशिवाय…”, चाहत्याने हातावर काढलेला टॅटू पाहून शिव ठाकरेची प्रतिक्रिया, म्हणाला…

सध्या स्मिता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेत पाहायला मिळत आहे. शशांक केतकर व शिवानी मुंढेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत स्मिताने जान्हवीची भूमिका साकारली आहे. या मालिकेशिवाय स्मिता दुसऱ्या बाजूला विविध चित्रपटात झळकत आहे.

गेल्या वर्षी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात तिनं तानाजी मालसुरे यांची पत्नी सावित्री मालसुरेंची भूमिका साकारली होती. लवकरच ती आता दिग्पाल यांचा आगामी चित्रपट ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’मध्ये पाहायला मिळणार आहे.

चित्रपट, मालिका या पलीकडे स्मिताचं युट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर ती दैनंदिन जीवनातल्या समस्या, विशेष म्हणजे स्त्रीयांच्या समस्या याविषयी व्हिडीओ करत असते. स्मिताच्या युट्यूब चॅनलवर साडे चार लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत.

हेही वाचा – अरुंधतीची भूमिका करताना मधुराणी प्रभुलकरला स्वतःमधल्या ‘या’ नव्या गोष्टीचा लागला शोध, म्हणाली…

दरम्यान, ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपटानंतर स्मिताने ‘चल लवकर’, ‘आलटून पालटून’, ‘मन्या सज्जना’, ‘लाडीगोडी’, ‘या गोलगोल डब्यातला’, ‘थँक्यू विठ्ठला’, ‘वन रुम किचन’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.