मराठी चित्रपटात प्रथमच ‘रेगे’ या चित्रपटातून अंडरवर्ल्डचे विश्व, पोलिसांचे विश्व या दोन्हींतील व्यवहार, आजच्या तरुणाईला असलेली छानछोकी, स्टाईल, पैसा, मौजमजा याची आवड आणि या सगळ्यावर तितक्याच भेदकपणे पण कोणताही आव न आणता केलेले भाष्य दाखविण्यात आले आहे. ‘तुमचं तुमच्या मुलांकडे लक्ष आहे का’ या टॅगलाइननुसार दिग्दर्शकाने चित्रपट उलगडला असला तरी आणखीही त्याला अनेक पदर आहेत हेही दिग्दर्शकाने सूचित केले आहे. ‘फ्लॅशबॅक’ तंत्राचा समर्पक वापर करून चित्रपटाची गोष्ट उलगडण्यात दिग्दर्शक निश्चित यशस्वी झाला आहे. परंतु, अशा पद्धतीचा चित्रपट पाहण्याची सवय नसल्यामुळे कदाचित काही प्रसंगांची संगती लावताना आणि त्यातील अर्थ समजावून घेताना प्रेक्षकांचा काहीसा गोंधळ होण्याची शक्यता आहे.
अनिरुद्ध विक्रम रेगे हा वैद्यकीय शिक्षण घेणारा उच्च मध्यमवर्गीय, सुखवस्तू तरुण. त्याचे वडीलही ख्यातनाम डॉक्टर आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांला शिकणाऱ्या रेगेला एका टोळीचा म्होरक्या एम भाईची स्टाईल, त्याचा बिनधास्त बेमूर्वतपणा, त्याचे वागणे-बोलणे, त्याची सत्ता, त्याचा रुबाब याचे आकर्षण वाटते. जगण्यातले ‘थ्रिल’ एम भाई अनुभवतो असे रेगेला वाटत राहते. पिस्तूल घेऊन ऐटीत फिरणे याची उत्सुकता रेगेला वाटते. पक्या या मित्रामुळे रेगे एम भाई टोळीच्या संपर्कात येतो आणि काही गुन्हेगारी घटना पाहतो. या घटना रेगेला चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्यासमोर घेऊन येतात आणि पोलिसी खाक्या, अंडरवर्ल्ड टोळ्यांच्या काळ्या वास्तवाची धग त्याला जाणवते. परंतु, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. अनिरुद्ध विक्रम रेगेच्या वाढदिवसाच्या दिवसापासून चित्रपट सुरू होतो तो एक काळ आहे, त्याच्या वाढदिवसाच्या एक वर्ष आधीच्या घटनांचा काळ आणि त्याच्या वाढदिवसाच्या नंतर घडलेल्या घटनाप्रसंगांचा काळ अशा तीन काळातील घटनाप्रसंगांची गुंतागुंतीची गोष्ट दिग्दर्शक पडद्यावर उलगडतो. तीन काळ दाखवायचे असल्यामुळे फ्लॅशबॅक तंत्राचा वापर करण्यात आला आहे.
पोलिसांची कार्यपद्धती, गुन्हेगारांची कार्यपद्धती, थंड डोक्याने हत्या करण्याची मानसिकता, सर्वसामान्यांचा त्याकडे भेदरून, क्वचित उत्सुकतेने बघण्याचा कोन हे सारे दाखविताना रेगेच्या दृष्टिकोनातून दिग्दर्शकाने दाखविले आहे. पहिल्याच प्रसंगापासून या चित्रपटाची मांडणी यापूर्वी प्रेक्षकांनी न पाहिलेली आहे हे चटकन लक्षात येते आणि प्रेक्षकाला उत्कंठा वाटते. ही उत्कंठा शेवटच्या दृश्यापर्यंत टिकविण्यात आणि वाढविण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे छायालेखकाची भक्कम साथ, खुबीने लिहिलेली पटकथा आणि समर्पक संवाद  हे आहेच. त्याचबरोबरच गुन्हेगारी विश्व उलगडणाऱ्या चित्रपटापेक्षा वेगळ्या प्रकारचे पाश्र्वसंगीत याचाही उल्लेख करावा लागेल. अशा पद्धतीच्या चित्रपटात गुंडांच्या व्यक्तिरेखा, पोलिसांच्या प्रमुख व्यक्तिरेखा, पोलिसांच्या खबऱ्यांच्या व्यक्तिरेखा, विशिष्ट लकबी आणि मुख्य म्हणजे दिग्दर्शकाने प्रत्येक छोटय़ा छोटय़ा व्यक्तिरेखेपासून ते प्रमुख व्यक्तिरेखांपर्यंत निवडलेली कलावंतांची अचूक फळी आणि या सर्वच कलावंतांचा अभिनय यामुळे चित्रपट अधिक वास्तवदर्शी होतो. ‘पोलिसांनी केलेल्या चकमकीत अमुक तमुक ठार’ ही वृत्तपत्रांतील बातमी कोणतीही चकमक झाली तरी मथळा तोच ठेवून पोलीस देतील ती नावे एवढाच काय तो बदल करून येते हे सूक्ष्मपणे भाष्य करण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे.
अनिरुद्ध रेगेच्या भूमिकेतील आरोह वेलणकरचा अभिनय लाजवाब आहे. विशेषत: पोलिसांनी पकडल्यानंतर, त्यांच्याकडून मार खाताना भेदरलेल्या अवस्थेचे दर्शन त्याने चांगले घडविले आहे. महेश मांजरेकरांनी साकारलेला प्रदीप शर्मा, पुष्कर श्रोत्रींनी साकारलेला सचिन वाझे केवळ अप्रतिम आहेत. संतोष जुवेकर मोहनलाल यादवच्या भूमिकेत भाव खाऊन जातो. प्रवीण तरडे यांनी पोलिसी खाक्यातला अधिकारी लकबीतून आणि संवादफेकीतून उत्तम दाखविला आहे. अंडरवर्ल्ड जगताविषयीची उत्सुकतेने एका तरुणाचे आयुष्य कसे भरकटते ते वास्तवदर्शीपणे दाखविणारा हा उत्तम चित्रपट आहे.
‘रेगे’
निर्माते- रवि जाधव फिल्म्स, एआरडी एण्टरटेन्मेंट्स, अभिजीत पानसे रील्स अ‍ॅण्ड आर्टबिट इनोव्हेशन्स
लेखक-दिग्दर्शक – अभिजीत पानसे
संवाद – अभिजीत पानसे, प्रवीण तरडे
छायालेखक – महेश लिमये
संगीत – अवधूत गुप्ते
पाश्र्वसंगीत – मॉन्टी शर्मा
कलावंत – आरोह वेलणकर, महेश मांजरेकर, पुष्कर श्रोत्री, संतोष जुवेकर, प्रवीण तरडे, विजू माने, अवधूत गुप्ते, उदय सबनीस, रमेश परदेशी, अनंत जोग.

Mumbai, 22 Year Old Woman Drugged, Filmed Obscene video, Accused demanded Extortion, Mumbai, malvani news, Mumbai news, crime news, malvani police station,
दाम्पत्याने गुंगीचे औषध देऊन तरूणीचे केले अश्लील चित्रीकरण; बलात्कार, खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा
mrunal thakur reveals she felt intimidated while working with Shahid Kapoor expert shares tips to overcome
मृणाल ठाकूरने सांगितले शाहिद कपूरबरोबर काम करताना दडपण येण्याचं कारण; वाक्यही न आठवण्याची स्थिती का आली?
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष