भारतीय चित्रपटसृष्टीच्या शंभराव्या वर्षांत तांत्रिकदृष्टय़ा मराठी चित्रपटसृष्टीही भलतीच प्रगत होत चालली आहे. ‘बालक-पालक’च्या निमित्ताने पहिल्यांदाच ‘व्हच्र्युअल प्रीमिअर’ ही संकल्पना अनुभवणाऱ्या मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्याचा जिताजागता अनुभव घेता येणार आहे. सचिन पिळगावकर त्यांच्या आगामी ‘एकुलती एक’चा ‘व्हच्र्युअल प्रीमिअर’ करण्यात येणार आहे. प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी २३ मे रोजी महाराष्ट्रातील पाच शहरांतील ठरावीक चित्रपटगृहांत हा ‘प्रीमिअर’ होणार आहे.
‘एकुलती एक’च्या माध्यमातून सचिन यांची मुलगी श्रिया पदार्पण करीत आहे. त्याचबरोबर २३ मे रोजी सचिन यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्षे पूर्ण होत आहेत. हा योग साधत याच दिवशी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या पाच शहरांतील प्रत्येकी एका चित्रपटगृहात ‘व्हच्र्युअल प्रीमिअर’ करण्यात येणार आहे. या वेळी सचिन व श्रिया हे दोघेही पाचही ठिकाणच्या प्रेक्षकांशी एकाच वेळी संवाद साधतील.
चित्रपटाचा प्रीमिअर हा प्रामुख्याने चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्याच साथीने होतो. मात्र आपण चित्रपट प्रेक्षकांसाठी बनवतो. त्यामुळे त्यांच्या साथीने प्रीमिअर करून आपणही त्यांच्याबरोबर आहोत, याचा आनंद त्यांना देण्याचा हेतू या ‘व्हच्र्युअल प्रीमिअर’मागे असल्याचे सचिन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ‘एकमेकांच्या बाप आणि मुलगी असलेल्या दोन अनोळखी व्यक्ती’, या संकल्पनेभोवती या चित्रपट फिरतो, असेही त्यांनी सांगितले.
मराठीतच नव्हे, तर संपूर्ण भारतात पहिल्यांदा ‘व्हच्र्युअल प्रीमिअर’ झालेला पहिला चित्रपट म्हणून ‘बालक-पालक’ची नोंद झाली आहे. कलाकारांना किंवा दिग्दर्शकाला संपूर्ण महाराष्ट्रात फिरून प्रेक्षकांना भेटणे शक्य होतेच असे नाही. त्यामुळे युएफओच्या मदतीने आपण ‘व्हच्र्युअल प्रीमिअर’चा मार्ग निवडला. लोकांशी संवाद साधताना अनेक चांगल्या गोष्टी तर गवसतातच, पण त्याचबरोबर चित्रपटाची प्रसिद्धी होण्यासही याची मदत होते, असे ‘बीपी’चा दिग्दर्शक रवी जाधवने सांगितले.