‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी डॉ. जब्बार पटेल, ज्योती चांदेकर यांची निवड
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
येत्या १४ जून रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंत नाटय़ मंदिर-माटुंगा येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर हे अध्यक्ष तर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सवरेत्कृष्ट एकपात्री पुरस्कारासाठी रमेश थोरात, नाटय़ परिषद कार्यकर्ता पुरस्कारासाठी अॅड. देवेंद्र यादव, नाटय़ समीक्षक पुरस्कारासाठी शांता गोखले, सवरेत्कृष्ट प्रायोगिक संस्था पुरस्कारासाठी परिवर्तन नाटय़संस्था-जळगाव, बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी नयना डोळस यांची निवड करण्यात आली आहे. अन्य पुरस्कार असे
मराठी व्यावसायिक रंगभूमीवरील विविध पुरस्कारांची नामांकने जाहीर करण्यात आली असून १४ जून रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.
या वेळी नाटय़गीत, एकपात्री आणि लावणी नृत्याचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
- प्रायोगिक नाटक-‘एम एच १२ जे १६’
- प्रायोगिक संगीत नाटक-संगीत स्वरसम्राज्ञी
- प्रायोगिक नाटक- उत्कृष्ट अभिनेता-आशीष भिडे
- प्रायोगिक नाटक-उत्कृष्ट अभिनेत्री- ज्योती राऊळ
- प्रायोगिक नाटक- उत्कृष्ट दिग्दर्शक- सुबोध पंडे
- प्रायोगिक संगीत नाटक- गायक अभिनेता-कृष्णा चारी
- प्रायोगिक संगीत नाटक- गायिका अभिनेत्री -श्रद्धा जोशी
- नाटय़ परिषद शाखा कार्यकर्ता पुरस्कार-किरण येवलेकर
- सवरेत्कृष्ट व्यवस्थापक-श्रीकांत तटकरे
- निवेदक पुरस्कार-समीर इंदूलकर
- गुणी रंगमंच कामगार पुरस्कार-सतीश खवतोडे
- लोककलावंत पुरस्कार-विजय साळवे
- रंगकर्मी पुरस्कार- प्रदीप कब्रे