समाजात घडणाऱ्या बदलांचं प्रतिबिंब ज्या ज्या कलाविष्कारातून उमटतं त्यात चित्रपट हे आजघडीला महत्त्वाचं माध्यम आहे. सामाजिक बदलांसाठी कारणीभूत असलेल्या घटना, व्यक्ती या कुठल्याही कलेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात. चित्रपटही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे प्रेम, शृंगार, वीररसात बुडालेल्या आपल्या चित्रपटांनी नेहमीच नाही, पण कधी तरी आपल्या ठोकळेबाज विषयांना दूर सारत आजूबाजूला घडणाऱ्या राजकीय-सामाजिक घटनांनाही स्थान दिले. मराठीत राजकीय चित्रपटांनी आपला एक स्वतंत्र ठसा उमटवला आहे. विजय तेंडुलकर, अरुण साधू यांसारख्या प्रतिभावान लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या राजकीय ‘चित्र’पटांनी मराठी प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती दिली. हिंदीमध्ये राजकीय विषय वेगवेगळ्या काळात तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार मांडले गेले. त्यामुळे अगदी उपहासात्मक राजकीय चित्रपटांपासून ते फाळणीनंतर बदलत गेलेल्या राजकीय घटनांचे समाजजीवनावर उमटलेले परिणाम दाखवणाऱ्या वास्तव चित्रपटांपर्यंत अनेक प्रकारे हे विषय हिंदीतून पाहायला मिळाले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय सत्ता-समीकरणांवर केंद्रित चित्रपट किंवा राजकीय व्यवस्थेवर भाष्य करण्याचे धाडस हिंदीबरोबर मराठीतही कोणी फारसे करताना आढळत नाही. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘आजचा दिवस माझा’ किंवा जयप्रद देसाई दिग्दर्शित ‘नागरिक’ अशी एखाददुसरी उदाहरणे सोडली तर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी नावेही तोंडावर येत नाहीत. सध्या आजूबाजूला महापालिका निवडणुकांचे पडघम वाजत असताना दरदिवशी एक नवी राजकीय घटना, बदलत गेलेली राजकीय समीकरणे आणि त्यातून पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा बांधला जाणारा अंदाज..असं रोज नवं नाटय़ समोर येत असताना चित्रपटांमध्ये त्याचं प्रतिबिंब का उमटत नाही? हा प्रश्न साहजिकपणे सतावत राहतो..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीमध्ये राजकीय चित्रपट असा उल्लेख झाला तरी आपल्याला काळाच्या मागेच जावं लागतं. ‘सिंहासन’, ‘सामना’, ‘वजीर’, ‘सरकारनामा’ हीच नावे प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात. यामागचं कारण स्पष्ट करताना तेंडुलकरांनी जेव्हा ‘सामना’ लिहिला तेव्हा या चित्रपटातील ज्या दोन व्यक्तिरेखा आहेत- एक स्वातंत्र्यसैनिक म्हणजे लागूंनी रंगवलेला मास्टर आणि दुसरा साखर कारखान्यांच्या जोरावर सत्ता हातात घेणारा हिंदुराव धोंडे पाटील या दोघांचीही प्रवृत्ती काय होती? याचा त्यांनी शोध घेतला होता, असे या चित्रपटाचे निर्माते आणि कवी रामदास फुटाणे यांनी सांगितले. राजकीय व्यवस्थेवर भाष्य करणारे चित्रपट मांडताना केवळ आपल्याला समोर जे दिसतं ते मांडून उपयोगी नसतं. तर सत्तेची म्हणन स्वत:ची एक वृत्ती असते आणि त्याचवेळी बुद्धिजीवी व्यक्तीचीही स्वतंत्र वृत्ती असते. या दोन वृत्तींमधला संघर्ष, त्यांची विचारप्रक्रिया मांडण्यासाठी मुळात ते कथालेखकाला समजणं गरजेचं असतं. इतक्या अभ्यासात्मक पद्धतीने कथा लिहिणारी मंडळी आता आपल्याकडे पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे राजकीय चित्रपटांच्या नावाखाली ज्या कथा दाखवल्या जातात त्या कित्येकदा बेगडी आणि वरवरच्या वाटतात, अशी टीका फुटाणे करतात. आत्ताच्या चित्रपटांमधून राजकारणी हे फक्त व्यंगचित्राचा विषय बनून राहिले आहेत, असं मत ते व्यक्त करतात. त्याकाळी विजय तेंडुलकर, अरुण साधू यांच्यासारख्या लेखकांनी वरवर दिसणाऱ्या राजकीय आणि सामाजिक घटनांच्या मुळाशी जाऊन ते विषय मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आजही त्या चित्रपटांमधली ताकद कायम असल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi political movieshindi political movies bollywood politics movies
First published on: 19-02-2017 at 03:45 IST