‘मसान’ या नीरज घायवान दिग्दर्शित पहिल्याच स्वतंत्र हिंदी चित्रपटाला यंदाच्या ‘कान’ महोत्सवातील ‘अनसर्टन रिगार्ड’ या गटातील पदार्पणातील दिग्दर्शनाचे पारितोषिक आणि ‘आंतरराष्ट्रीय सिनेसमीक्षक संघटना’ अर्थात ‘फीप्रेस्की’तर्फे दिले जाणारे पारितोषिक अशी दोन प्रतिष्ठेची पारितोषिके मिळाली आहेत. एरवी स्वतंत्र हिंदी चित्रपट भारतात प्रदर्शित करताना असंख्य अडचणींचा सामना निर्माता-दिग्दर्शकांना करावा लागतो. परंतु, आता प्रतिष्ठेच्या पारितोषिकांमुळे ‘मसान’ हा बॉलीवूड नव्हे तर स्वतंत्र हिंदी चित्रपट जुलै महिन्यात भारतात प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.
‘मसान’ या हिंदी शब्दाचा अर्थ स्मशान असा असून या चित्रपटात रिचा चढ्ढा आणि संजय मिश्रा या प्रेक्षकांच्या ओळखीच्या कलावंतांशिवाय नवोदित अभिनेता विकी कौशल, विनीत कुमार, श्वेता त्रिपाठी, पंकज त्रिपाठी आणि निखिल साहनी यांच्या भूमिका आहेत.
दिग्दर्शक नीरज घायवान यांनी आपल्या चित्रपटाला मिळालेल्या पारितोषिकांमुळे आपण भारावून गेलो आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच तब्बल पाच मिनिटे ‘कान’ महोत्सवाच्या प्रेक्षकांकडून ‘स्टॅण्डिंग ओव्हेशन’ मिळाल्याबद्दलही त्यांनी खूप आनंद व्यक्त केला. २०१० साली वाराणसी येथील घाटांवर केले जाणारे श्राद्धकर्म, त्याचबरोबर हिंदूंच्या निधनानंतर तिथे केले जाणारे अंत्यसंस्कार याच्याशी संबंधित विषयांवरचा हा भावनिक चित्रपट आपण तयार केला आहे. आपल्या चित्रपटाला पारितोषिक मिळाल्याने वास्तववादी चित्रपट म्हणजे खूप नीरस आणि कंटाळवाणा हा सर्वसामान्य सिनेरसिकांचा समज खोटा ठरण्यास बळ मिळाले आहे, असेही नीरज घायवान यांनी पारितोषिके स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले.
अस्सल आणि वास्तववादी सिनेमाच्या नव्या लाटेतील ‘मसान’ हा चित्रपट असून तद्दन बॉलीवूड सिनेमाच्या पलीकडे जाऊन दिग्दर्शकांची एक फळी बॉलीवूडच्या परिप्रेक्ष्यात राहूनही नवा विचार, नवी आणि वास्तव मांडणी करणारा सिनेमा बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. वास्तव पडद्यावर पाहून प्रेक्षकांची मने हेलावली पाहिजेत, त्यांना वास्तव हे निव्वळ कंटाळवाणे वाटता कामा नये, याची काळजी दिग्दर्शकांनी घेऊन सिनेमा बनवायला हवा, असे मतही नीरज घायवान यांनी व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jun 2015 रोजी प्रकाशित
‘कान’ महोत्सवात हिंदी सिनेमाला दोन प्रतिष्ठेची पारितोषिके
‘मसान’ या नीरज घायवान दिग्दर्शित पहिल्याच स्वतंत्र हिंदी चित्रपटाला यंदाच्या ‘कान’ महोत्सवातील ‘अनसर्टन रिगार्ड’ या गटातील पदार्पणातील दिग्दर्शनाचे

First published on: 02-06-2015 at 06:19 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Masan movie will release in india