#MeToo मोहिमेअंतर्गत ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर मुंबई कोर्टात सुनावणी झाली. मात्र या सुनावणीदरम्यान आलोक नाथ हजर नसल्याने कोर्टाने त्यांना फटकारले. लेखिका- निर्मात्या विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. विनता नंदा यांना सोशल मीडियावर या आरोपांसंदर्भात पोस्ट करण्याची मुभा कोर्टाने दिली आहे. विनता नंदा यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर बंधनं आणण्याची मागणी आलोक नाथ यांनी केली होती.

विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. विनता नंदा यांच्या आरोपांनंतर आलोक नाथ यांनी कायद्याचा आधार घेत त्यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. आलोक नाथ यांना कोर्टात उपस्थितीची सक्ती नसावी अशी मागणी त्यांच्या वकीलाने कोर्टात केली. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळत या प्रकरणात आलोक नाथ हीच मुख्य व्यक्ती असून त्यांना पुढील सुनावणीत हजर राहण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

२० वर्षांपूर्वी बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेतील ‘सर्वात संस्कारी अभिनेत्याने’ माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला. विनता नंदा यांच्या पोस्टनंतर काही अभिनेत्री आणि महिलांनीही आलोक नाथ यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले. या प्रकरणामुळे मानहानी झाल्याचं म्हणत आलोक नाथ यांनी विनता नंदाविरोधात न्यायालयामध्ये मानहानीचा दावा केला.