आपल्या हटके गायन शैलीने आणि तितक्याच अफलातून अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या किशोर कुमार यांचं खासगी आयुष्यही बरच रंजक होतं. त्यांच्या गाण्याच्या रेकॉर्ड रुममध्ये जितका कल्ला असायचा तितकाच कल्ला हा अभिनेता, गायक रोजच्या आयुष्यातही करायचा. त्यांनी एकूण चार लग्न केली. हिंदी चित्रपटसृष्टीची ‘हुस्न ए मल्लिका’ मधुबाला ते अगदी ‘चायनीज गुडिया’ म्हणून ओळखली जाणारी लीना चंदावरकर यांच्याशी किशोर कुमार विवाहबद्ध झाले होते.
अभिनेत्री लीना चंदावरकर किशोरजींची चौथी पत्नी होती. ‘मेहबूब की मेहंदी’ या चित्रपटातून राजेश खन्ना यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणारी ही अभिनेत्री गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रकाशझोतात नसली तरीही किशोर कुमार यांचा विषय निघताच लीना चंदावरकर हे नावही समोर येतं.
चित्रपटांमधून झळकणाऱ्या लीनाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण, तिच्या कुटुंबातील मंडळींचा मात्र तिला विरोध होता. पण, तरीही तिने चित्रपटांमध्ये काम करणं सोडलं नाही. त्यानंतरच्या काळात लीना चंदावरकर सिद्धार्थ बांदोडकरसोबत लग्न करुन चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला. पण, त्यांच्या लग्नानंतर काही दिवसांतच सिद्धार्थचं निधन झालं. त्यावेळी लीनाचं वय २५ वर्षे होतं. सिद्धार्थच्या जाण्यानंतर लीना एकट्या पडल्या होत्या. चित्रपटसृष्टीत परतण्याचा त्यांचा कोणताच मनसुबाही नव्हता. इतकंच नव्हे तर त्यांनी आत्महत्या करण्याचाही विचार केला होता.
वाचा : …म्हणून ऋषी कपूर यांना मारण्यासाठी गेला होता संजय दत्त
त्यानंतर ‘प्यार अजनबी है’ या चित्रपटासाठी त्यांना विचारण्यात आलं ज्या निमित्ताने त्यांच्या आणि किशोर कुमार यांच्या मैत्रीचा नवा प्रवास सुरु झाला. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि लीनाने किशोर कुमार यांच्याशी लग्न करण्याचा आपला निर्णय वडिलांना सांगितला. पण, तिच्या वडिलांचा या निर्णयाला नकार होता. कारण, किशोर कुमार लीनापेक्षा २० वर्षांनी मोठे होते, त्यातही त्यांची आधी तीन लग्न झाली होती.
कुटुंबियांच्या विरोधात जात लीना चंदावरकर आणि किशोर कुमार विवाहबद्ध झाले. १९८० मध्ये विवाहबद्ध झालेल्या या जोडीला एक मुलगाही आहे. पण, मुलगा अवघ्या पाच वर्षांचा असतानाच किशोर कुमार यांचं निधन झालं आणि वयाच्या ३७ व्या वर्षी लीना पुन्हा एकट्या पडल्या. त्यानंतरच्या काळात त्या किशोर कुमार यांच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच रुमा गुहासोबत राहू लागल्या.