अॅमेझॉन प्राइमवरील ‘मिर्झापूर’ या गाजलेल्या वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागानंतर या वेब सीरिजच्या सिक्वलची जोरदार मागणी झाली होती. अखेर पहिल्या सिझनच्या वर्षपूर्तीनिमित्त अॅमेझॉन प्राइमने ‘मिर्झापूर २’चा टीझर प्रदर्शित केला आहे. अवघ्या १५ सेकंदांच्या या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढवली आहे.

‘जो आया है वो जाएगा भी, बस मर्जी हमारी होगी’, हा कालिन भैय्याच्या आवाजातील संवाद या टीझरमध्ये ऐकायला मिळतो. ‘मिर्झापूर’मध्ये कालिन भैय्याची भूमिका अभिनेता पंकज त्रिपाठीने साकारली होती. कालिन भैय्यासोबतच, गुड्डू आणि मुन्ना त्रिपाठी या भूमिका प्रेक्षकांमध्ये फार लोकप्रिय झाल्या. अली फजल गुड्डूच्या तर दिव्येंदू शर्मा मुन्ना त्रिपाठीच्या भूमिकेत होते. आता दुसऱ्या सिझनमध्ये नेमकं काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

‘मिर्झापूर २’ टीझरच्या निमित्ताने पंकजने इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. इन्स्टाग्रामवर पदार्पण करत पंकजने पहिली पोस्ट टीझरची केली आहे. उत्तर भारतातील बाहुबलींचे स्वत:च्या जिवापुरते मर्यादित साम्राज्य, त्यातून होणारे वाद आणि साम्राज्यांतर्गत होणाऱ्या कुरघोडी हा या वेबसीरिजचा पाया आहे. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी पहिला भाग प्रदर्शित झाला होता. २०२० मध्ये हा दुसरा सिझन प्रदर्शित होणार आहे.