अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘मिर्झापूर’ या गाजलेल्या वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. येत्या २३ ऑक्टोबर रोजी ही सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. ‘मिर्झापूर २’चे चित्रीकरण काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले असून सध्या त्याच्या डबिंगचं काम सुरू आहे.
उत्तर भारतातील बाहुबलींचे स्वत:च्या जिवापुरते मर्यादित साम्राज्य, त्यातून होणारे वाद आणि साम्राज्यांतर्गत होणाऱ्या कुरघोडी हा या वेब सीरिजचा पाया आहे. या बाहुबलींनी सारा प्रदेश आपापल्या पद्धतीने वाटून घेतलेला असतो. मिर्झापूर हे अखण्डा त्रिपाठीचे असते. त्याचे सारे काळे धंदे हे गालिच्याच्या व्यवसायाआड सुरू असतात, त्यामुळे तो कालिन भैय्या म्हणून देखील ओळखला जात असतो. मिर्झापूरमधील एका लग्नाच्या वरातीत त्याचा वाह्यात मुलगा मुन्ना दारूच्या नशेत हवेत गोळीबार करताना नवऱ्या मुलाचाच बळी घेतो. ती केस कोणताही वकील स्वीकारत नाही, पण रमाकांत पंडित ती स्वीकारतात. अर्थातच मुन्ना रमाकांत पंडितांच्या घरात घुसून दमदाटी करतो. परिणामी त्याची दोन्ही मुले गुड्डू आणि बबलू प्रतिकार करतात. त्या मुलांचा हा जोश पाहून कालिन भैय्या त्या दोघांना त्यांच्या व्यवसायात सामावून घेतात. या दोघांमुळे मुन्नाला बाजूला टाकल्याची भावना निर्माण होते. त्यातून पुढचे महाभारत घडते.
१६ नोव्हेंबर २०१८ रोजी या सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता.
