हरयाणाची मानुषी छिल्लर सध्या भारताचे नाव संपूर्ण जगात उज्वल करतेय. काही दिवसांपूर्वीच चीनमधील सान्या येथे पार पडलेल्या मिस वर्ल्ड या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मानुषी छिल्लर हिला मिस वर्ल्ड होण्याचा मान मिळाला. विविध देशांतील सौंदर्यवतींना मागे टाकत मिस वर्ल्ड होणारी मानुषी भारतात परतली असून, तिने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.

मिस वर्ल्डचा किताब मिळाला तेव्हा मानुषीला मोदींनीसुद्धा शुभेच्छा दिल्या होत्या. तमाम जनतेच्या शुभेच्छांचा स्वीकार करत काही दिवसांपूर्वीच ती मायदेशी परतली. भारतात आल्यापासूनच ती विविध कार्यक्रमांनाही हजेरी लावत असल्याचे पाहायला मिळाले. या साऱ्यामध्ये ती पंतप्रधांनांची भेट कधी घेणार याविषयीसुद्धा अनेकांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर तिने मोदींची भेट घेतली असून, यावेळी तिची आईसुद्धा उपस्थित होती. पंतप्रधानांमागोमाच मानुषीने कुरुक्षेत्र येथे हरयाणाचे मुख्यमंत्री एम.एल. खत्तर यांचीही भेट घेतली.

वाचा : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचे पाकिस्तानला जशास तसे उत्तर

वाचा : जाणून घ्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा ‘डाएट प्लॅन’

महिलांचे आरोग्याच्या दृष्टीने आखण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये मानुषीचा सहभाग असतो. त्यामुळे त्याच क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल घडवून आणण्याचा तिचा मानसही आहे. त्यामुळे मोदी भेटीमध्ये तिने याविषयी चर्चा केली हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मानुषी सध्या तिच्या करिअरच्या दृष्टीने बरीच सजग असून, बॉलिवूडपेक्षा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याकडे तिचा जास्त कल आहे.