रुपेरी पडद्यावर आई अजरामर करणाऱ्या सुलोचना लाटकर यांचं निधन झालं आहे. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुलोचना दिदी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांची मुलगी कांचन घाणेकर यांनी दिली होती. मात्र रुग्णालयामध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर अशी आई होणे नाही आणि अशी दीदी होणे नाही म्हणत राज ठाकरेंनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी?

सुलोचना दीदींचं निधन झालं. ‘दीदी’ ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अधिक अवघड. ही उपाधी पुढे चिकटली काहींना पण पेलवता आली फक्त लता दीदींना आणि सुलोचना दीदींना. कारण दोघींच्यात असलेला सोज्वळपणा, ठेहराव आणि कामाप्रतीची निष्ठा ह्यामुळे.

हिंदी सिनेमात ६०, ७० आणि ८० च्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत ‘आई’ हे सिनेमातलं महत्वाचं पात्र असायचं. पण ‘आई’ पण पडद्यावर ज्यांनी जिवंत केलं ते फक्त निरुपमा रॉय आणि सुलोचना दीदींनी. बाकीची आईची पात्रं ही एकतर बालिश केली गेली आणि त्यांच्यात नकारात्मक छटा आणल्या गेल्या.

सुलोचना दिदींच्यात ‘आईपण’ हे अंगभूत होतं त्यामुळे त्यांना पडद्यावर भूमिका वठवताना विशेष अभिनय करावा लागलाच नाही. त्यामुळे त्यांच्या आईच्या भूमिका आयुष्यभर लक्षात राहिल्या. पण हिंदीत जितकं वैविध्य नाही मिळालं तितकं वैविध्य त्यांना मराठी सिनेमांत मिळालं, हे मराठी सिनेमाचं भाग्य. एखादी भूमिका प्रेक्षकाला इतकी विश्वासार्ह वाटावी असा योग दुर्मिळ असतो जो सुलोचना दीदींच्या वाट्याला आला होता. अशी ‘आई’ होणे नाही, अशी ‘दीदी’ होणे नाही.

सुलोचना दीदींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.

सुलोचनादीदींची कारकीर्द रुपेरी पडदा व्यापून टाकणारी ठरली यात काहीही शंकाच नाही. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टी पोरकी झाल्याची भावनाही अनेक कलाकारांनी व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांच्याविषयी केलेलं भाष्य चर्चेत आहे.