मराठी सिनेसृष्टीतील नवोदित अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेने नुकताच अभिनेता परेश रावल यांच्यासोबतचा एक छान सेल्फी तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला. त्या सेल्फीला तिने ‘डिअर फादर’ असं कॅप्शनही दिलंय. मात्र, तिच्या या कॅप्शनने बरेच चाहते गोंधळले आहेत. श्रीरंग गोडबोले यांची ही कन्या परेश रावल यांना आपले ‘डिअर फादर’ असे का म्हणतेय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मृण्मयी आणि परेश रावल हे सध्या एकत्र काम करत असून त्यावेळी तिने हा सेल्फी काढला आहे.

मृण्मयी ही अभिनेता परेश रावल यांच्यासोबत एका गुजराती नाटकात अभिनय करतेय आणि त्या नाटकाचं नाव ‘डियर फादर’ असं आहे. या नाटकाचे जवळ जवळ ५०० प्रयोग झाले असून नाटकासाठी मृण्मयीने भारतभर तसंच अमेरिका, लंडन, दुबई, सिंगापुर, नैरोबी या ठिकाणी दौरे केले. मृण्मयी या नाटकात परेश रावल यांच्या सुनेची भूमिका साकारत आहे. त्यामुळे नाटकातील ‘फादर-इन-लॉ’ सोबत काढलेला एक कूल सेल्फी तिने तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. फोटोप्रमाणेच या दोघांची ऑन स्टेज केमिस्ट्री पण तितकीच चांगली असेल यात शंकाच नाही.

मृण्मयीने ‘राजवाडे अॅण्ड सन्स’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. लवकरच ती परेश मोकाशीच्या ‘चि. व चि.सौ.का.’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत ‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम ललित प्रभाकर याची प्रमुख भूमिका आहे. ललित आणि मृण्मयी या चित्रपटात स्क्रिन शेअर करत असल्यामुळे एक नव्या जोमाची जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.  मधुगंधा कुलकर्णीच्या लेखणीतून साकारला हा चित्रपट मे महिन्याच्या १२ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.