|| असिफ बागवान

‘मानवी मनाशी गूढसंवाद साधण्याची, तो टिपण्याची क्षमता हे सिनेमाचं शक्तिशाली वैशिष्टय़ आहे,’ असं म्हणणारे सत्यजित रे यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून सिनेमाचं हे सामर्थ्य अधिक प्रभावीपणे दाखवून दिलं. मानवी भावभावना, स्वभाव, संबंधांचे विविध पदर उलगडून दाखवणाऱ्या रे यांच्या चित्रपटांइतक्याच त्यांनी लिहिलेल्या कथाही मनाच्या गूढ गर्भातील खळबळ टिपणाऱ्या. वरकरणी साध्यासरळ वाटणाऱ्या या कथा त्यातील बारीकसारीक तपशील आणि ठसठशीत वर्णनांमुळे वाचकाच्या विचारविश्वाला खंगाळून काढतात. रे यांच्या पोतडीतून उचललेल्या अशाच चार कथांपासून साकारलेली ‘रे’ ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवरून प्रसारित झाली आहे. सयांतन मुखर्जीने निर्मिलेल्या निरेन भट्ट आणि सिराज अहमद यांची पटकथा असलेल्या आणि श्रीजित मुखर्जी, अभिषेक चौबे, वासन बाला यांनी दिग्दर्शित केलेली ही मिनी वेबसीरिज रे यांच्या जन्मशताब्दी वर्षांत त्यांना दिलेली श्रद्धांजली ठरावी.

चार भागांच्या ‘रे’मध्ये सत्यजित रे यांच्या चार कथा मांडण्यात आल्या आहेत. त्यांचा एकमेकांशी बिलकुल संबंध नाही. मात्र, त्यांच्या मुळाशी स्वत्त्वाचा, त्याच्या जाणिवेचा शोध घेण्याचा प्रयत्न हे समान सूत्र दिसून येते. यातली पहिली कथा फरगेट मी नॉट. श्रीजित मुखर्जीने दिग्दर्शित केलेली. ईप्सित रामा नायर (अली फझल) हा अतिशय यशस्वी उद्योजक आहे. कोणत्याही यशस्वी उद्योजकाप्रमाणे भोवतीच्या कॉपरेरेट विश्वात ईप्सित एक प्रेरणास्रोत आहे आणि त्यापेक्षाही ‘मानवी संगणक’ ही त्याची ओळख त्याला अधिक सुखावणारी. ईप्सित नायर-कधीच कोणतीही गोष्ट न विसरणारा, वक्तशीर आणि पूर्णपणे व्यावहारिक व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या ईप्सितच्या आयुष्यात अचानक त्याच्या भूतकाळातील एक तुकडा आव्हान म्हणून उभा ठाकतो. यातलं आव्हान असं की, तो भूतकाळ घडल्याचं ईप्सितला अजिबात आठवत नाही. एका तरुणीसोबत घालवलेल्या त्या चार दिवसांचं न आठवणं हे ईप्सितसाठी त्याच्या लौकिकालाच धक्का पोहोचवणारं. त्यामुळे ईप्सित इतका अस्वस्थ होतो की शेवटी तो मनोरुग्णालयात पोहोचतो. हे कसं घडतं, ते प्रत्यक्ष पाहणं चांगलं. मिर्झापूर आणि अन्य काही वेबसीरिजनंतर अधिक आत्मविश्वासपूर्ण वाटणाऱ्या अली फझलच्या शारीरिक ठेवणीतून ईप्सित झळकतोच पण अभिनयातूनही त्याने मनोवस्थेच्या तीन टप्प्यांतील ईप्सित छान साकारला आहे. त्याच्यासोबत श्वेता बसू, आनंदिता बोस यांची प्रमुख भूमिका आहे.

दुसऱ्या कथेत, बहुरूपीमध्ये अभिनेता के. के. मेनन शीर्षक भूमिकेत आहे. कुठल्याशा एका कंपनीत मेकअप आर्टिस्टची नोकरी करणारा इंद्राशीष हा अतिशय साधा माणूस आहे. पण त्याचा हा साधेपणाच अनेकांच्या टिंगलीचा, हेटाळणीचा विषय आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या मानसिक पिडेमुळे खचलेल्या इंद्राशीषला अचानक त्याच्या मृत आजीची धनसंपत्ती वारशाने मिळते. यामध्ये पैसा आहेच पण त्यासोबत रंगभूषेचं अतिउत्तम कसब शिकवणारं पुस्तक आणि साहित्यही मिळतं. हे कसब आत्मसात करून इंद्राशीष स्वत:च्या चेहऱ्यावरच ते प्रयोग करू लागतो आणि त्याला छळणाऱ्यांना धडा शिकवू लागतो. ही कला म्हणजे आपल्याला प्राप्त झालेलं दैवत्व, हा अहंकार त्याला विनाशाकडे कसा घेऊन जातो, हे बहुरूपी दाखवते. के. के. मेनन हा इंद्राशीष आहे आणि इंद्राशीष म्हणजेच बहुरूपी आहे. त्यामुळे त्याच्याव्यतिरिक्त अन्य व्यक्तिरेखा केवळ गरजेपुरत्या आहेत. त्यातही राजेश शर्मा आणि दिबेंदू भट्टाचार्य भाव खाऊन जातात. या कथेचं दिग्दर्शनही श्रीजित मुखर्जीनेच केलं आहे.

आधीच्या दोन्ही कथा सरळ प्रवाह बदलून अचानक गंभीर, धोक्याचं वळण घेणाऱ्या. पण तिसरी कथा मात्र, आपला मूळ प्रवाह न सोडता अतिशय विनोदी ढंगाने मथितार्थाकडे घेऊन जाते. अभिषेक चौबे दिग्दर्शित हंगामा है क्यू बरपा ही म्हणजे मनोज वाजपेयी आणि गजेंद्र राव या दोन मातब्बर कलाकारांची जुगलबंदी आहे. एका मैफिलीसाठी रेल्वेने दिल्लीला निघालेला लोकप्रिय गझलगायक मुसाफिर अली (वाजपेयी) याला त्याच्याच कंपार्टमेंटमध्ये अस्लम बेग (राव) भेटतात. दोघांनाही आपण एकमेकांना आधी पाहिलं असल्याचं जाणवतं पण त्याची उपरती प्रथम मुसाफिर अलीला होते. काही वर्षांपूर्वी अशाच रेल्वेच्या डब्यात आपण ज्या व्यक्तीचं घडय़ाळ लांबवलं, ते हेच बेगसाहब हे लक्षात येताच मुसाफिर अली गांगरून जातो आणि बेगशी नजरानजर टाळण्याचे हरतऱ्हेने प्रयत्न करतो. चोरीमुळे मनात निर्माण झालेली अपराधी भावना आणि त्यातून पुढे घडत गेलेला गमतीशीर प्रवास प्रेक्षकांना वेगळय़ाच प्रदेशात घेऊन जातो. ही सफर मनोरंजनही करते आणि मनाच्या विचित्रावस्थेची जाणीवही करून देते. मनोज वाजपेयी आणि गजेंद्र राव यांनी आपापल्या व्यक्तिरेखा तितक्याच ताकदीने पेलली आहे. मनोज पहावा आणि रघुवीर यादव यांचीही यात छोटी पण परिणामकारक भूमिका आहे.

स्पॉटलाइट ही चौथी कथा विक अर्थात विक्रम अरोरा (हर्षवर्धन कपूर) या सुपरस्टारची. या विककडे अभिनय कौशल्य सुमार दर्जाचंच आहे. पण त्याचं देखणं रूप आणि विशिष्ट पद्धतीने पाहण्याची पद्धत यांमुळे तो लोकप्रिय आहे. लोकांना पसंत असला तरी आपल्या या लुकचा विकला मात्र कंटाळा येऊ लागला आहे. अशातच राजस्थानच्या एका पॅलेस हॉटेलात तो मुक्कामाला उतरतो. याच हॉटेलात एक आध्यात्मिक गुरू-दीदी आणि तिचा लवाजमा दाखल होतो. दीदीच्या आगमनानंतर विकभोवती असलेला चाहत्यांचा गराडा आटून जातो. इतकंच नव्हे तर, दीदीच्या अस्तित्वामुळे आपलं अस्तित्वच पुसून चाललंय असं विकला प्रखरतेने जाणवू लागतं. यातून तो कोणत्या थराला जातो आणि त्याची परिणती कशात होते, हे स्पॉटलाइटमधून समोर येतं. विकच्या भूमिकेत हर्षवर्धन कपूर, दीदीच्या भूमिकेत राधिका मदन, विकच्या पीएच्या भूमिकेत चंदन रॉय सान्याल यांनी बॉलीवूड आणि अध्यात्मिक जगातील झगमगाटात वावरणाऱ्या व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला यांनी केले आहे.

वर म्हटल्याप्रमाणे चारही कथा मानवी भावविश्वात स्वत:ची ओळख राखण्यासाठी, जपण्यासाठी, समृद्ध करण्यासाठीची धडपड अधोरेखित करतात. रेंच्या कथांवर बेतलेल्या असल्या तरी पटकथा रचताना त्यात काळानुरूप बदल केलेले आहेच; शिवाय काही कथांचा शेवट अधिक गडदही करण्यात आला आहे. हे होत असताना काही प्रमाणात त्याला बटबटीतपणाही येतो. मात्र दिग्दर्शक आणि अभिनयाच्या खुबीमागे तो झाकला जातो. त्यातली हंगामा है क्यू बरपा ही कथा मात्र, रे यांच्या कथेतून जशीच्या तशी पटकथेत उतरली आहे. त्यामुळेच की काय ती अधिक परिणामकारक आणि रंजकही वाटते. अर्थात इतर कथा रंजकमूल्यात कमी नाहीत. पात्रांची निवड, पाश्र्वसंगीत, प्रकाशाचा वापर अतिशय उत्तमपणे केला गेला आहेच; पण चारही कथांमध्ये आरशांचा किंवा प्रतिबिंबांच प्रभावी वापर करण्यात आला आहे. ही प्रतिबिंबे म्हणजे जणू त्या व्यक्तिरेखाचा स्वत्त्वात डोकावण्याचा प्रयत्न असल्याचे जाणवते.

सत्यजित रे यांच्या नावामुळे ‘रे’ला आधीच एक मोठे वलय मिळाले आहे. त्यात श्रीजित मुखर्जी, अभिषेक चौबे आणि वासन बाला या वेगळय़ा विचारांच्या दिग्दर्शकांमुळे ही वेबसीरिज आणखी वलयांकित होते. मनोज वाजपेयी, के. के. मेनन, गजेंद्र राव यासारख्य़ांच्या अभिनयामुळे ती अधिक समृद्ध होते. करोना र्निबधांमुळे गेली दीडेक वर्षे टीव्हीच्या पडद्यावरच मनोरंजनाची भूक भागवू पाहणाऱ्या रसिकांसाठी ‘रे’ हा उत्तम पर्याय आहे. शिवाय नेटफ्लिक्सने हा पहिला सीजन असल्याचं जाहीर केलं असल्यामुळे दुसऱ्या सीजनचीही उत्कंठा लागून राहणार आहे.