राजकारणावरील हिंदी-मराठीमध्ये अनेक चित्रपट येऊन गेलेत. राजकारणी-गुन्हेगार संबंध, अलीकडच्या काळात बिल्डर-राजकारणी हितसंबंध या विषयांवर चित्रपट आले आहेत. एका संवेदनशील पत्रकाराच्या नजरेतून राजकारणाकडे पाहणारा ‘नागरिक’ हा चित्रपट असून चित्रभाषेचा प्रभावी वापर करत सूचक दिग्दर्शन करण्यात आले आहे. मुख्य व्यक्तिरेखेसह सर्वच प्रमुख व्यक्तिरेखांसाठी उत्तम कलावंतांची अचूक निवड, संयत मांडणी, उत्तम छायालेखन, संगीत, अतिशय कमी संवाद असलेला हा चित्रपट आहे. अनेक प्रसंग प्रभावीपणे चित्रित करण्यात आले असले तरी त्याची गुंफण करताना आणि शेवटाला त्याची उकल करताना प्रेक्षकाला नीटपणे चित्रपटाचा उलगडा होऊ शकत नाही. सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती सूचक भाष्य करण्याचा प्रयत्न चित्रपट नक्कीच करतो.
श्याम जगदाळे हा मुख्य राजकीय वार्ताहर चित्रपटाचा नायक आहे. अवतीभवती चाललेल्या घडामोडी, राजकारण-बिल्डर आणि बाबा-बुवा यांचे संगनमत, त्यातून घडणाऱ्या घटना, कामगारांचे आंदोलन, त्यात झालेला हिंसाचार, मुख्यमंत्री बदलणे या साऱ्या घटना पाहत असताना त्याला जाणवलेले सत्य लोकांसमोर मांडताना श्याम जगदाळे अनेकदा हतबल होतो. संपादकांशी वादविवाद झाल्यानंतर नोकरीचा राजीनामा देतो. परंतु, घटनांच्या मुळाशी जाऊन सत्याचा शोध घेत राहतो.
प्रसारमाध्यमांमधून दाखविण्यात येणाऱ्या घटना, एकामागून एक घडणाऱ्या घटनांचा एकमेकांशी असलेला संबंध, त्याचा परिपाक म्हणून घडणारी आणखी दुसरी घटना आणि त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न नायक करतो. मात्र हे सगळे संवादातून व्यक्त होण्याऐवजी चित्रभाषेतून सूचकपणे मांडण्याचा दिग्दर्शनाचा प्रयत्न स्तुत्य असला तरी घटनाप्रसंगांची संगती लावताना केलेली पटकथेची मांडणी करताना घोळ झाला आहे असे प्रेक्षकाला नक्कीच जाणवत राहते. त्याचप्रमाणे आजच्या काळातील श्याम जगदाळे हा मुख्य राजकीय वार्ताहर भाबडा वाटतो.
श्याम जगदाळे हा नायक सचिन खेडेकर यांनी उत्तम प्रकारे आपल्या अभिनयातून दाखवला आहे. श्याम जगदाळेची हतबलता, त्याची विफलता, सर्वसामान्यांची तसेच सत्ताधाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभ्या ठाकणाऱ्या लोकांची हतबलता, त्यातून राजकारण्यांविरुद्धची चीड अशा भावभावनांचे प्रकटीकरण खेडेकर यांनी आपल्या अभिनयातून केले आहे.
दोन घटना प्रसंगांमधील सांधा जोडण्यासाठी अर्थपूर्ण पद्धतीने शाहिरीचा केलेला वापर या गोष्टी प्रभावीपणे मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. मात्र मुख्य राजकीय वार्ताहरपदी काम करणारी व्यक्ती आजच्या काळात इतकी भाबडी असू शकते का हा प्रश्न प्रेक्षकाला पडल्यावाचून राहत नाही. प्रसारमाध्यमांचे मालक, संपादक आणि कंपनीचे हितसंबंध जपण्यासाठी केली जाणारी पत्रकारिता या गोष्टीही दिग्दर्शकाने मार्मिक पद्धतीने दाखविल्या आहेत.
निवृत्त राजकीय व्यक्तीच्या भूमिकेतील डॉ. श्रीराम लागू, आधी पर्यटनमंत्री आणि नंतर मुख्यमंत्री ही भूमिका करणारे दिलीप प्रभावळकर, केवळ मतांचा जोगवा मिळावा म्हणून घटना घडविण्याचा कट रचणारा विकास पाटील या भूमिकेतील मिलिंद सोमण, अमराठी बिल्डरच्या भूमिकेतील राजेश शर्मा, बिल्डरचा साथीदार या भूमिकेतील माधव अभ्यंकर अशा सगळ्याच कलावंतांचा उत्तम अभिनय हे या चित्रपटाचे निश्चितपणे बलस्थान आहे.
‘लखलख चंदेरी’ या गाण्यानंतर एकामागून एक सुन्न करणाऱ्या घटनांचा अर्थ उमगल्यानंतर सैरभैर झालेला श्याम जगदाळे दाखविताना याच गाण्याच्या संगीताचा निराळ्या पद्धतीने वापर करण्याचा प्रभावी प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे. एकुणात चित्रपट प्रभावी बनविण्यासाठी दिग्दर्शकाने अतिशय सूचक पद्धतीचा वापर केला आहे.
नागरिक
निर्माती – आरती सचिन चव्हाण
दिग्दर्शक – जयप्रद देसाई
कथा – संवाद – महेश केळुस्कर
पटकथा – महेश केळुस्कर, जयप्रद देसाई
संगीत – तब्बी-परिख, संभाजी भगत
छायालेखक – देवेंद्र गोलतकर
संकलक – गोरक्षनाथ खांडे
वेशभूषा – भानू अथय्या
ध्वनिसंयोजन – रसूल पोकुट्टी, अमृत प्रीतम
कलावंत – सचिन खेडेकर, डॉ. श्रीराम लागू, नीना कुळकर्णी, दिलीप प्रभावळकर, सुलभा देशपांडे, मिलिंद सोमण, राजेश शर्मा, देविका दफ्तरदार, राजकुमार तांगडे व अन्य.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jun 2015 रोजी प्रकाशित
राजकारणावरचे सूचक भाष्य
राजकारणावरील हिंदी-मराठीमध्ये अनेक चित्रपट येऊन गेलेत. राजकारणी-गुन्हेगार संबंध, अलीकडच्या काळात बिल्डर-राजकारणी हितसंबंध या विषयांवर चित्रपट आले आहेत. एका संवेदनशील पत्रकाराच्या नजरेतून राजकारणाकडे पाहणारा ‘नागरिक’ ...

First published on: 14-06-2015 at 01:24 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagrik film review