कर्जत शहरामध्ये आज (दि.२४) ‘नटरंग’ फेम सोनाली कुलकर्णीच्या रूपात ‘अप्सरा’ अवतरणार असल्याने आबालवृद्धांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सायंकाळी पाच वाजता येणार आहे. कर्जत येथे जनसेवा फाऊंडेशन, पंचायत समिती कर्जत व महिला विकास महामंडळ, कर्जत तालुका कृषी विभाग यांच्या वतीने दि. २४, २५, व २६ फेब्रुवारी रोजी ‘लेक वाचवा’ अभियानांतर्गत सक्षम महिला कर्जत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संत गोदड महाराज क्रीडानगरीच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार असून याचे संयोजक डॉ. सुजय विखे आहेत. या सक्षम महिला कर्जत महोत्सवास उद्या शनिवारी सुरुवात होत असून, याचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकणी यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता होणार आहे.  डॉ. सुजय विखे यांच्या कार्यालयाचे उद्घाटनदेखील सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते येथे होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या दिवशी उद्घाटन आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान होणार आहे. दुसऱ्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे, तर समारोपाच्या दिवशी हास्यविनोद कार्यक्रम आणि भव्य लकी ड्रॉ याचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस बचत गटांच्या माध्यमातून महामेळावा घेतला जाणार आहे. यामध्ये ज्वेलरी, विविध प्रकारची खेळणी, शोभेच्या वस्तू, पर्स, रेडीमेड गारमेंट, चप्पल, बूट, घोंगडी, आवळा उत्पादने, विविध मसाले, हुरडा, लोणचे, हातसडीचे तांदूळ, राजूरचे प्रसिद्ध पेढे, कडधान्य, झुणका-भाकर, विविध चटण्या, खवय्यांसाठी  कर्जतची प्रसिद्ध शिपीआमटी, सामोसे, चकली, वडापाव, थालीपीठ, पुरणपोळी, चिक्की, मांडे, वांग्याचे भरीत, असे अनेक खाद्यपदार्थ, तसेच शेतकऱ्यांसाठी शेतीचे नवीन तंत्रज्ञान, ठिबक सिंचन शेतीची सुधारित अवजारे यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natrang fame sonali kulkarni in karjat festival
First published on: 24-02-2018 at 05:17 IST