करोना विषाणूचे संक्रमण अद्याप नियंत्रणात आलेले नाही. परिणामी लॉकडाउनचा काळही काहीसा लांबवला जात आहे. मात्र या लॉकडाउनमुळे चित्रपट उद्योगाचे तीनतेरा वाजले आहेत. दररोज लाखो रुपयांचं नुकसान होत आहे. अनेक लहानमोठे कलाकार बेरोजगार झाले आहेत. व्यवसाय पुर्वपदावर आणण्यासाठी निर्मात्यांनी चित्रीकरण सुरु करण्याची परवानगी सरकारकडे मागितली आहे. परंतु अशा विनंती करण्यापेक्षा थेट न्यूझीलंडला जाऊन चित्रीकरण करावं असा सल्ला अभिनेता कमाल खानने बॉलिवूडला दिला आहे.

काय म्हणाला कमाल खान?

“न्यूझीलंड हा जगातील पहिला करोना फ्री देश ठरला आहे. त्यामुळे बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांनी मुंबईमध्ये चित्रीकरणाची वाट पाहाण्यापेक्षा थेट न्यूझीलंडला जाऊन काम सुरु करावं. मुंबईपेक्षा चांगलं वातावरणही तुम्हाला तिथं मिळेल.” अशा आशायाचे ट्विट कमाल खानने केलं आहे.

कमाल खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तो कायम विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि राजकारणी मंडळींवर टीका करत असतो. यावेळी त्याने करोनाचे निमित्त साधून बॉलिवूड निर्मात्यांना सल्ला दिला आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जाणांनी या ट्विटसाठी त्याची खिल्ली देखील उडवली आहे.