प्रत्येक यशस्वी चित्रपटाची कुंडली एकसारखीच असेल असे नसते याचे सर्वात उत्तम उदाहरण ‘माहेरची साडी’. तुम्हाला आश्चर्य वाटेल आजही या चित्रपटाचे वितरक-निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके याच चित्रपटाच्या यशाने असे काही ओळखले जातात की त्यानंतर त्यानी एकाही चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केलेले नाही हे देखिल जाणवले नाही. इतकेच नव्हे तर अलका कुबल आठल्ये आजही माहेरची साडीची सोशिक नायिका म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जातात.
‘माहेरची साडी’च्या कथानकात फारसे वेगळे वा चमकदार असे काहीच नव्हते. सासूकडून होणारा सूनेचा छळ, त्यातून तिचा झालेला दुखद अंत व भाऊ-बहिणीची माया अशी साधारण गोष्ट होती. पण गावागावात हेच घडत असेल तर? म्हणून तर प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचविण्यात यश आले. गंमत म्हणजे या चित्रपटाने मराठी चित्रपट वीस वर्षे मागे नेला असे काही समीक्षकांनी म्हणत चित्रपटात पाहण्यासारखे काहीच नाही अशी टीका केली. पण प्रत्यक्षात मात्र पुढची वीस-पंचवीस वर्षे या चित्रपटाचा ग्रामीण भागातील प्रभाव कायम राहीला.
अलका यांना प्रचंड सहानुभूतीपूर्वक लोकप्रियता प्राप्त झाली. काही काळ तर चित्रपटाच्या नावात माहेर व पोस्टरभर अलका हे मराठी चित्रपटाच्या यशाचे सूत्र होते. या चित्रपटात विक्रम गोखले, आशालता, अजिंक्य देव, उषा नाडकर्णी, विजय चव्हाण, किशोरी शहाणे, रमेश भाटकर इत्यादींच्याही भूमिका होत्या. तर चित्रपटातील ‘नेसली माहेरची साडी’ हे गाणे त्याकाळात प्रत्येक लग्नसोहळ्यात आवर्जुन वाजविले जाई. तसेच ‘माझं छकुल छकुल’ या गाण्याने प्रत्येक बारसे पार पडत असे.
विशेष म्हणजे या चित्रपटातील नायिकेसाठी अलका कुबल या पहिली पसंत नव्हत्या. सोशिक नायिकेच्या भूमिकेसाठी विजय कोंडके यांना भाग्यश्री पटवर्धन हवी होती. त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न देखिल केले. पण भाग्यश्री हो म्हणेना म्हणूनच त्यांनी अलका यांची निवड केली. त्यांची ही निवड चित्रपट, अलका आणि त्यांच्या पत्थ्यावर पडली.