अजय देवगण निर्मित ‘हेलिकॉप्टर ईला’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काजोलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरवर गीतकार स्वानंद किरकिरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्रेलरच्या श्रेयनामावलीत स्वानंद यांचं नाव समाविष्ट न केल्याने सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
इंडस्ट्रीतल्या बऱ्याच कलाकारांनीही सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. ‘स्वानंद यांनी त्या चित्रपटात लिहिलेली बरीच गाणी एडीट करून ट्रेलरमध्ये वापरली. तरीसुद्धा ट्रेलरच्या श्रेयनामावलीत त्यांचं नाव कुठेच दिसत नाही. हे खूप चुकीचं आहे,’ असं मत एका ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांनी मांडलं.
वाचा : आता शेतात राबणार नवाजुद्दीन सिद्दीकी; कसाऱ्यात खरेदी करणार शेतजमीन
बऱ्याच ट्विटर युजर्सनीही अजय देवगणचा उल्लेख करत संताप व्यक्त केल्याने अखेर अजयने माफी मागितली. ‘हेलिकॉप्टर ईला’ या चित्रपटाच्या टीमकडून मी माफी मागत आहे, असं तो म्हणाला.
‘३ इडियट्स’, ‘बर्फी’, ‘राजनिती’ यांसारख्या चित्रपटांसाठी स्वानंद यांनी गाणी लिहिली आहेत. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चुंबक’ या मराठी चित्रपटात त्यांनी अभिनयसुद्धा केलं आहे. दरम्यान प्रदीप सरकार दिग्दर्शित आणि अजय देवगण, जयंतीलाल गडा यांची निर्मिती असणारा ‘हेलिकॉप्टर ईला’ हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.