राष्ट्रीय पुरस्कारानंतर लोकांच्या आपेक्षांमध्ये झालेल्या वाढीचा ताण आपण घेत नसल्याचे ‘फॅंड्री’ चित्रपटाद्वारे प्रसिध्दीच्या झोतात आलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे म्हणणे आहे. गोवा मराठी चित्रपट महोत्सवात वृत्तसंस्थेशी बोलताना नागराज म्हणाले, राष्ट्रीय पुरस्कारानंतर चित्रपटकर्ता म्हणून लोकांच्या जरी माझ्याकडून अपेक्षा वाढल्या असल्या, तरी मी याचा ताण करून घेत नाही. मी माझे काम करत राहीन. मी माझ्या मर्यादा जाणतो. चित्रपटकर्ता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने कोणताही बदल होता कामा नये. पुरस्कार म्हणजे तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक असते, ज्यामुळे तुम्हाला शक्ती प्राप्त होते, यातून हेच अपेक्षित आहे. परंतु राष्ट्रीय पुरस्कारामुळे लोक तुम्हाला ओळखायला लागतात आणि तुम्ही चांगले काम करता असे त्यांना वाटू लागते. ‘फॅंड्री’ या आपल्या चित्रपटाद्वारे समाजातील अस्पृश्यतेवर भाष्य करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘फॅंड्री’ विषयीच्या आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, जरी ‘फॅंड्री’द्वारे मी आयुष्यात अनुभवलेले अनुभव व्यक्त केले असले, तरी या चित्रपटाद्वारे मी कोणाविषयीचा रोश दार्शविला असल्याचे म्हणता येणार नाही. रोश हा नकारात्मक शब्द आहे. या चित्रपटाद्वारे मला आशेचा किरण दिसतो. हे सांगतानाच या चित्रपटाच्या यशामुळे आयुष्यात काही गोष्टींमध्ये बदल झाल्याचेदेखील नागराज यांनी कबूल केले. मागील वर्षी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समिक्षकांकडून वाखाणण्यात आलेला आणि यावर्षी फेब्रुवारी महिन्यात चित्रपटगृहात झळकलेल्या आपल्या या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक नागराज म्हणाले, व्यावसायीक दृष्ट्या चांगली कामगिरी केलेल्या या चित्रपटाने दहा अठवडे पूर्ण केले आहेत. पुणे आणि मुंबईसह चित्रपटाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. सध्या नागराज मंजुळे ‘सैराट’ या चित्रपटावर काम करत आहेत. चित्रपटाची कथा तयार असून, वर्षाआखेरीला ‘सैराट’च्या चित्रीकरणास सुरुवात होईल.