हृदयेश आर्ट्स संस्थेचा वर्धापन दिन, ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे ८० व्या वर्षांत पदार्पण आणि त्यांच्या ‘भावसरगम’ या कार्यक्रमाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष यानिमित्ताने २६ ऑक्टोबर रोजी एका खास सोहळ्याचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. आशा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ‘भावसरगम’चा विशेष प्रयोग यावेळी सादर होणार आहे. याच कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. जसराज यांना यंदाचा हृदयेश आर्ट्सचा ‘हृदयनाथ’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्ताने..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हृदयनाथ माझा धाकटा भाऊ असला तरी मी त्याला माझा ‘गुरू’ मानते. वयाने लहान असला तरी कर्तृत्वाने तो खूप मोठा आहे. त्याचा संगीताचा अभ्यास प्रचंड आहे. अर्थात त्यासाठी त्याने अपार कष्ट घेतले आहेत. त्यातूनच त्याने संगीत क्षेत्रात आपले स्वत:चे स्वतंत्र स्थान व वेगळी शैली निर्माण केली आहे. आमिर खॉं साहेबांचा गंडा त्याने लहानपणीच बांधला. आमचे बाबा गेले ते तेव्हा तो अवघा चार वर्षांचा होता. सतत आजारी असायचा. त्यातच त्याच्या पायाला गंभीर आजार झाल्याने आम्ही सगळेच तेव्हा खूप काळजीत होतो. पुण्याच्या सर्व निष्णात डॉक्टरांना दाखविले. त्याचा पाय कापावा लागेल, तो चालूच शकणार नाही, असे सांगून डॉक्टरांनी आम्हाला घाबरवून सोडले होते. दरम्यान पुण्याहून आम्ही कोल्हापूरला राहायला गेलो होतो. दुखऱ्या पायाचा त्याला प्रचंड त्रास व्हायचा, धड चालता यायचे नाही, आशाच त्याला उचलून घेऊन जायची. अशात जडीबुटी व झाडपाल्याचा उपयोग करून औषधोपचार करणाऱ्या एका खेडवळ दिसणाऱ्या माणसाशी आमची भेट झाली. आम्ही बाळला त्याला दाखविले. त्याने कसलासा  पाला औषध म्हणून दिला आणि पाण्यात गरम करून तो त्याच्या पायावरील जखमेवर बांधायला सांगितला. त्या उपायाने त्याचा पाय बरा झाला, पण पायात थोडासा दोष राहिला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pt jasraj to get hridaynath award
First published on: 23-10-2016 at 01:17 IST