प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. आयुष्यात प्रत्येकाला एकदा तरी प्रेमात पडावं असं वाटतंच. प्रेमाचं स्थान प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ असतं पण तरीही प्रेमाचा रंग प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. काहींना त्यांचं प्रेम पहिल्या भेटीतच गवसतं तर काहींना हुलकावणी देतं. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकांची कथा आपण आजवर अनेकवेळा बघितली आहे पण ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेच्या माध्यमातून अपघाताने लग्नबंधनात अडकलेल्या प्रेम आणि राधाची कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

वाचा : ‘दीपिकाच्या शिरच्छेदासाठी जाहीर करण्यात आलेल्या बक्षिसावरही जीएसटी?’

एकासाठी लग्न म्हणजे केवळ एक व्यवहार आहे आणि दुसऱ्यासाठी लग्न म्हणजे संसार ! कसा रंगेल या प्रेमकहाणीचा करार ? प्रेम रंगात रंगणाऱ्या राधेची कथा,२४ नोव्हेंबरपासून सोम ते शनि रात्री ९.०० वा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . कलर्स वाहिनीवरील या मालिकेत कविता लाड – मेढेकर, शैलेश दातार, सचित पाटील, वीणा जगताप, अक्षया गुरव, निरंजन नामजोशी, गौतम जोगळेकर, ऋग्वेदी प्रधान, अपर्णा अपाराजीत प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

वाचा : १५ वर्षांच्या संसारानंतर हे मराठी सेलिब्रिटी जोडपे होणार विभक्त

राधा ही आजची कार्यक्षम, स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे जिचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. तर प्रेम हा व्यवहार चातुर्याने वागणारा, वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळणारा आणि ज्याचं लग्न, कुटुंब, प्रेम याच्यावर मुळीच विश्वास नाही असा मुलगा आहे. अशी दोन परस्परविरोधी स्वभावाची ही दोन पात्र लग्नबंधनामध्ये अडकतात आणि त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. आता हे लग्न त्यांना का करावे लागले ? कुठल्या परिस्थितीत हे लग्न झाले ? या सगळ्या निरुत्तरित प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.