‘रामन राघव’ हा शब्द साठ ते सत्तरच्या दशकात मुंबईत वावरलेल्या कित्येकांसाठी अंगावर काटा आणणारा आहे. निर्घृणपणे एकापाठोपाठ एक चाळीस हत्या करणाऱ्या रामन राघवने या शहरात एक दहशत निर्माण केली होती. पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेला हा सीरियल किलर अखेर त्यांच्या जाळ्यात सापडला तेव्हा कुठे ही जिवंत दहशत गजाआड बंदिस्त झाली. पण त्याने लोकांच्या मनावर केलेल्या भीतीच्या जखमा अजूनही पुसल्या गेलेल्या नाहीत. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘रामन राघव’ चित्रपटात एकेकाळी भीतीचे साम्राज्य उभे करणाऱ्या या खुन्याची मानसिकता, त्याच्या अविचारी आणि मोकाट वागण्यामुळे समाजावर उभे राहिलेले भीतीचे सावट आणि पोलिसांची कसोटी अशा कितीतरी गोष्टी कश्यप शैलीत पाहायला मिळतील, अशी अपेक्षा निर्माण होते. मात्र इथेच रामनच्या कथेत शिरण्यापेक्षा एकाच नाण्याच्या दोन बाजू छाप कथा स्वीकारत अनुरागने आपल्या त्याच त्याच घासून पुसून जुन्या झालेल्या कश्यप शैलीची प्रचीती दिली आहे.
चित्रपटाच्या पहिल्याच फ्रेममध्ये आपली रामन्ना किंवा रामनशी ओळख होते. पैशासाठी एका माणसाची लोखंडी हातोडय़ाने हत्या करणारा रामन आपल्याला दिसतो न दिसतो तोच त्या फ्रेममध्ये राघवन ऊर्फ राघवचा प्रवेश होतो. एकाच घरात, एकाच वेळी दोन वेगवेगळ्या हत्या होतात. दुसऱ्या फ्रेममध्ये हाच राघव पोलीस म्हणून हत्येच्या ठिकाणी तपास करण्यासाठी येतो. नऊ हत्या के ल्याचा कबुलीजबाब देणारा रामन समोर असूनही राघव आणि त्याच्याबरोबरचे पोलीस अधिकारी त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यानंतर मोकाट सुटलेल्या रामनच्या हत्यांचा सिलसिला पुन्हा सुरू होतो तो आपल्या बहिणीपासून. रामन आणि त्याच्या बहिणीचा एक कटू भूतकाळ आहे. त्याची पुसटशी माहिती मिळते. मुळात बहिणीवर बलात्कार करून तिची, तिच्या नवऱ्याची आणि लहानग्या मुलाची हत्या करणारा रामन मनोरुग्ण होता का? त्याच्या आजच्या वागण्यावर त्याच्या भूतकाळाचा परिणाम होता का? स्वत:ला देवाचा माणूस मानणारा आणि देव सांगेल त्याचीच आपण हत्या करतो असे सांगणाऱ्या रामनच्या मानसिकतेचा वेध घेण्याचा कोणताही प्रयत्न दिग्दर्शकाने के लेला नाही. त्याउलट, रामनची प्रवृत्ती आणि पोलीस म्हणून वावरणाऱ्या राघवची प्रवृत्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा दावा करत दिग्दर्शकाने कथेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.
रामनच्या बरोबरीनेच आपल्याला राघवची कथा यात पाहायला मिळते. राघव स्वत: नशेच्या आहारी गेलेला पोलीस अधिकारी आहे. पबमध्ये भेटलेल्या एका तरुणीचा केवळ लैंगिक संभोगासाठी वापर करून घेणारा, तिला सतत शिव्याशाप देणारा, मारझोड करणाऱ्या राघवला लग्नाबद्दल तिटकारा आहे. त्याचे त्याच्या वडिलांबरोबर असलेले तिरस्काराचे नातेही एका प्रसंगात आपल्याला दिसते. आपल्या वागण्याबद्दल त्याला पश्चात्तापही होतो, पण त्याच्या अशा वागण्यामागचेही कारण दिग्दर्शक देत नाही. आणि त्यामुळेच रामन आणि राघव या दोघांच्या प्रवृत्ती सारख्याच आहेत हे भासवण्याचा प्रयत्न पुरेपूर फसला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या अभिनयाच्या ताकदीने जो रामन उभा केला आहे त्याला तोड नाही. त्याच्या भेदक डोळ्यांचाही चांगला वापर करून घेतला आहे. त्याला तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न ‘मसान’ फेम अभिनेता विकी कौशलने केला असला तरी राघव ही व्यक्तिरेखा पटकथेतच फसली असल्याने साहजिकच त्याचा प्रभाव मर्यादित झाला आहे. ‘मला वाटतं म्हणून मी लोकांना मारून टाकतो, लोकांना मारण्यासाठी मला तुमच्यासारखा वर्दीचा आधार घ्यावा लागत नाही’, यासारखे संवाद उत्तम जमून आले आहेत. मात्र त्यामुळे चित्रपटाचे गलबत तारून जाऊ शकत नाही. विषय डार्क असल्याने त्याला त्याच काळोख्या पद्धतीचे चित्रण, चाळींमधून तिथल्या उकिरडय़ांवरून फिरणारा कॅ मेरा या जुन्याच तंत्राचा आधार दिग्दर्शकाने घेतला आहे. पूर्वार्धातली संथ मांडणी आणि त्यानंतरची अनुराग कश्यपची भडक मांडणीची शैली या चित्रपटात हमखास खटकते. साठच्या दशकातील रामनसारखा सीरियल किलर आणि आजच्या काळातील पोलीस अधिकारी यांच्या वृत्तीतला साम्यपणा दाखवत तथाकथित न्यायव्यवस्थेतील फोलपणावर दिग्दर्शकाने बोट ठेवले आहे, असे म्हणणे धाष्टर्य़ाचे ठरेल. कारण त्यासाठी योग्य ती तर्कसुसंगत मांडणीच दिग्दर्शकाला करता आलेली नसल्याने या नाण्याची कोणतीच बाजू आपल्याला पटत नाही उलट गोंधळात टाकते.
रामन राघव
निर्माता – अनुराग कश्यप, विकास बहल, विक्रमादित्य मोटवने आणि मधु मन्टेना
दिग्दर्शक – अनुराग कश्यप
कलाकार – नवाजुद्दीन सिद्दीकी, विकी कौशल, अमृता सुभाष, शोबिता धुलिपाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raman raghav review
First published on: 26-06-2016 at 02:03 IST